Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तरुणांमध्ये वाढत आहे फॅटी लिव्हरची समस्या, जाणून घ्या कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

तरुणांमध्ये वाढत आहे फॅटी लिव्हरची समस्या, जाणून घ्या कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

यकृताशी संबंधित समस्यांपैकी फॅटी लिव्हर ही सर्वात सामान्य समस्या आहे, ज्यावर वेळेवर उपचार न केल्यास प्राणघातक ठरू शकते. आजकाल चैनीच्या आणि बैठी जीवनशैलीमुळे ही समस्या युवा वर्गात झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या लेखात, आम्ही फॅटी लिव्हरचे जोखीम घटक आणि ते टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल माहिती सांगणार आहोत. जेणेकरून त्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकेल. आजकाल भारतातील अनेक तरुण फॅटी लिव्हरमुळे त्रस्त आहे. फॅटी लिव्हर कशामुळे होतो याबद्दल तर आपण जाणून घेणार आहोतच, पण त्या आधी फॅटी लिव्हर म्हणजे काय? याबद्दल जाणून घेऊ.

फॅटी लिव्हर म्हणजे काय?

फॅटी लिव्हर म्हणजे यकृतामध्ये अतिरिक्त चरबी तयार होणे. फॅटी लिव्हर रोग जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे होतो असे सर्वसामान्य निदान आहे. मात्र गेल्या 30 वर्षांत, डॉक्टरांना हे समजू लागले आहे की असे अनेक रुग्ण आहेत जे मद्यपान न करून देखील त्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे. हा विकार नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) म्हणून ओळखला जातो. या प्रकारच्या फॅटी लिव्हरमुळे यकृत सुजणे, यकृतावरील डाग (सिरॉसिस), यकृताचा कर्करोग तसेच यकृत निकामी होणे यांसारख्या समस्या उद्भवतात, ज्यामध्ये रुग्णाचा जीवदेखील जाऊ शकतो .

फॅटी लिव्हरचे जोखीम घटक कोणते आहेत?

आजची तरुणाई लेट नाइट पार्ट्या, जंक फूड आणि व्यसनाच्या आहारी गेली आहे. शिवाय बैठी काम तसेच दीर्घकाळ विश्रांतीमुळे त्यांचे शरीर अनेक समस्यांचे घर बनत चालले आहे. ज्यामुळे वजन वाढ, कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्या उद्भवतात. परिणामी फॅटी लिव्हरसारखे आजार निर्माण होतात.

फॅटी लिव्हरच्या जोखीम घटकामध्ये लठ्ठपणा, उच्च कोलेस्टरॉल, PCOS, टाइप-2 मधुमेह, हायपोथायरॉईडीझम यांसोबतच मेटाबॉलिक सिंड्रोमचा देखील समावेश आहे. या व्यतिरिक्त अत्याधिक प्रमाणात मद्यपान केल्याने देखील यकृतावर ताण येऊन, फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. म्हणून यकृतसंबंधित समस्या असलेल्या लोकांना मद्यपान न करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

फॅटी लिव्हरवर प्रतिबंधात्मक उपाय काय आहे?

निरोगी आहार आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करून, तरूणांमध्ये वाढत चाललेला फॅटी लिव्हरचा धोका कमी केला जाऊ शकतो. फॅटी लिव्हरचे जोखीम घटक आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती जाणून घेऊया.

पोषक आहाराचे सेवन

आहारात प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त आहार किंवा जंक फूडचे प्रमाण जास्त असल्याने फॅटी लिव्हरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे संपूर्ण धान्य, हिरव्या भाज्या, फळे, दही, मासे, बीन्स, चिकन, अंडी इत्यादींचा आहारात समावेश करा. यासोबतच भरपूर पाणी पिणेही खूप गरजेचे आहे.

वजन नियंत्रित करणे

फॅटी लिव्हरचे सर्वसामान्य जोखीम घटक लठ्ठपणा आणि वाढलेले वजन हे आहे. त्यामुळे आपले निरोगी वजन राखणे खूप महत्वाचे आहे. यासाठी सकस आहार घेणे आणि व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.

शारीरिक क्रिया

व्यायाम केल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि चयापचय क्रिया सक्रिय होते. तसेच एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू नका, मध्येच लहान ब्रेक घ्या. व्यायाम करता येत नसेल तर किमान अर्धा तास चाला. शारीरिक हलचाली होतील अशा क्रियाकलापामध्ये भाग घ्या.

कोलेस्टेरॉलच्या पातळीवर नियंत्रण

कोलेस्टेरॉलच्या पातळीची नियमित तपासणी करा आणि ते नियंत्रित करण्यासाठी निरोगी आहाराचे अनुसरण करा.

रक्तातील साखरेचे नियमन

रक्तातील साखरेची पातळी वाढणे यकृतासाठी खूप धोकादायक ठरू शकते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे आणि त्यासाठी त्याचे नियमन करणे अत्यंत आवश्यक आहे.

अल्कोहोल पिणे टाळा

अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे यकृताशी संबंधित अनेक गंभीर आजार होऊ शकतात, ज्यामध्ये फॅटी लिव्हर ते लिव्हर कॅन्सरचा समावेश होतो. त्यामुळे अल्कोहोलचे सेवन टाळा. याव्यतिरिक्त, तंबाखू तसेच इतर धूम्रपान संबंधित गोष्टी ज्या यकृतासाठी घातक आहेत त्याचे सेवन करू नका.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.