स्थानिक सेठ बन्सीधर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील व्हरांड्यात फिरणार्या एका विद्यार्थ्यास राष्ट्रगीत प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहण्यास सांगणार्या एका सहाय्यक शिक्षकावर त्या विद्यार्थ्याने प्राणघातक हल्ला करून त्यांना मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवार 5 एप्रिल रोजी घडला. या घटनेमुळे संबंधित शिक्षक हे भेदरले असून त्यांना जबरदस्त शारीरिक मानसिक धक्का बसला आहे. या प्रकरणी कार्यवाहीस्तव मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे निवेदन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद शिक्षण विभाग अकोला यांना पाठविण्यात आले आहे.
तेल्हारा येथील उपरोक्त महाविद्यालयात शिकणारा एक विद्यार्थी घटनेच्या दिवशी 5 एप्रिल रोजी सकाळी 7:45 वाजता शाळेत आला. त्यावेळी राष्ट्रगीत व प्रार्थनेसाठी मैदानात विद्यार्थी रांगेत उभे होते .मात्र व्हरांड्यात फिरणार्या विद्यार्थ्यास विलास विठ्ठलराव यादगिरे नामक शिक्षकाने रांगेत उभे राहण्यास सांगताच तो विद्यार्थी चौताळून त्यांचे अंगावर धावून आला व समस्त विद्यार्थी विद्यार्थिनी समोर त्याने त्या शिक्षकांना शिवीगाळ करत शिक्षकाची कॉलर पकडून हातातील कड्याने डोक्यावर मारहाण केली.प्राणघातक हल्ल्याने यादगिरी यांना शारीरिक व मानसिक धक्का बसला आहे. एवढ्यावरच हा प्रकार न थांबता त्या विद्यार्थ्याने शिक्षकास धमकी दिली. प्राचार्यांच्या कक्षात त्याला समज देण्याचा प्रयत्न करण्यात आला तेथेही त्यांनी शिवीगाळ केली .पेपर संपल्यानंतर शाळेच्या मैदानात इतर विद्यार्थ्यांसोबत घोळक्यात तो उभा असताना शाळा पर्यवेक्षक भगवान भालेराव व सहाय्यक शिक्षक संतोष गावंडे यांचेशी त्याने हुज्जत घातली. टारगटपणा करणे, भांडण करणे शिक्षकांची गैरवर्तन हा त्याचा स्वभाव आहे असे मुख्याध्यापकांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर गोपाल फापट मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.