सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हतं, पण शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली. लवकरच विशाल पाटील निर्णय घेतील, अशी अपेक्षा आम्ही बाळगत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, मुंबईसारख्या शहरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते. ते म्हणजे लुंगी हटाव, पुंगी बजाव. त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले. मनसेने धारावी या ठिकाणी छ्ट पूजेला विरोध केला आणि बिहारमधील लोकांना मारले. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि जे दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहे. ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत. त्याचे कारण की, निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजपवाले घेतील. ते झालं की, मुंबईमधील पूर्ण गणित बदलते त्यासाठी आम्ही थांबलो होतो. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही मुंबईमधील उमेदवार जाहीर करणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले.काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांनी वंचित बहुजन आघाडीला पाहिजे तेवढा हुंडा मिळत नसल्याने ते महाविकास आघाडीत आले नाहीत असे विधान केले होते. यावर उत्तर देताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, निवडणुकांमध्ये जागांचा समझोता होता. आपण बघू शकतो की, कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नव्हते. त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चाच करू नये. आम्ही काढायला गेलो की इतर जणांना सार्वजनिक फिरायला कठीण जाईल. माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आहोत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.