Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच भाजप उमेदवाराचं निधन

मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच भाजप उमेदवाराचं निधन 


लखनऊ : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान पार पडलं. आता २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. दरम्यान, भाजपच्या एका उमेदवाराचं मतदानाच्या दुसऱ्या दिवशी निधन झालं. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुंवर सिंह सर्वेश कुमार सिंह यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी कुंवर यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, कुंवर सर्वेश कुमार सिंह यांचं निधन झालं. त्यांना गळ्याला त्रास होत होता आणि त्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. १९ एप्रिलला तपासणीसाठी ते एम्समध्ये गेले होते पण २० एप्रिलला त्यांचं निधन झालं. कुंवर सिंह सर्वेश कुमार सिंह ७२ वर्षांचे होते.

कुंवर सर्वेश यांना भाजपने २०१४ मध्ये मुरादाबादमधून तिकीट दिलं होतं. तेव्हा जिंकले पण २०१९ मध्ये सपाच्या उमेदवाराकडून पराभूत झाले होते. भाजपने पुन्हा एकदा कुंवर सर्वेश यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवार केलं होतं. त्यांच्या विरोधात समाजवादी पार्टीचा उमेदवार होता.

कुंवर सर्वेश हे मुरादाबाद जिल्ह्याच्या ठाकुरद्वारा विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा आमदार होते. त्यांचे वडील रामपाल सिंह १९८४ मध्ये अमरोहा इथून काँग्रेसचे खासदार होते. माजी खासदार कुंवर सर्वेश यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. योगी आदित्यनाथ म्हणाले की, मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनाने धक्का बसला. भाजपसाठी ही कधीही न भरून येणारी हानी आहे.

भूपेंद्र सिंह चौधरी यांनी शोक व्यक्त करताना म्हटलं की, भाजपचे नेते आणि मुरादाबादमधील भाजप कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत माजी खासदार कुंवर सिंह यांच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसला. सर्वेश सिंह यांचं निधन फक्त मुरादाबाद नव्हे तर उत्तर प्रदेशातील भाजपसाठी मोठं नुकसान आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.