वाढीव वीज बिलाच्या कारणावरुन महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार
बारामती : घरचे वीज बिल जास्त येत असल्याने घरातील वीज मीटर त्वरीत तपासावे अशी मागणी तरुणाने महावितरण कंपनीकडे केली होती. मात्र, कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या तरुणाने वीज उपकेंद्रात जाऊन याचा जाब विचारत तेथे असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मोरगाव येथे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
अभिजीत पोटे (रा. मोरगाव) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. या घटनेत रिंकु राम थिटे यांचा मृत्यू झाला आहे. रिंकु थिटे या मोरगाव वीज उपकेंद्रात कार्यरत होत्या. अभिजित पोटे याने त्यांच्यावर वार करुन गंभीर जखमी केले. त्यांना उपचारासाठी पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी पोटे याने वीज उपकेंद्रात तक्रार दाखल केली होती. त्याच्या घरातील वीज मिटरचे बील जास्त येत होते. त्यामुळे वीज मीटर त्वरीत तपासण्यात यावे याबाबत तक्रार दाखल केली होती. परंतु, तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, असे पोटे याला वाटले. त्याने चिडून जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि.24) सकाळी 11 च्या दरम्यान जाब विचारला.
तांत्रिक कर्मचारी महिला रिंकू राम थिटे यांच्यासोबत बोलत असताना पोटे याने रागाने त्यांच्यावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने सपासप वार केले. यात रिंकू थेटे गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यवर पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. पुढील तपास सुपे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.