सांगलीची जागा राखण्यासाठी माजी मंत्री विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी अजूनही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सांगली ही काँग्रेसची पारंपारिक जागा असल्याचने ती इतर पक्षाला सोडू नये, अशी काँग्रेसची भूमिका आहे. असे असतानाही काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी सांगलीच्या निकालाबाबत भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या विधानाने सांगलीच्या राजकीय वातावरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीत सांगलीची जागा काँग्रेसकडे येईल, अशी आशा होती. मात्र ऐनवेळी या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाविरोधात विश्वजीत कदम, विशाल पाटलांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठांची चर्चा केली. काही करून ही जागा आपल्याकडे घ्या, अशी गळ त्यांनी घातली होती. मात्र आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही जागा ठाकरे गटाकडेच राहिली आहे.आघाडीचे जागावाटप फायनल झाले असले तरी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीवरील दावा सोडला नाही. यातच शालिनीताई पाटलांनी येथून कोण विजयी होणार, याची भविष्यवाणी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे. ठाकरे गटाने येथून विचार करून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली असेल. या उमेदवारीला काही तरी विचार करूनच काँग्रेसच्या वरिष्ठांनी सहमती दिली असेल. त्यामुळे येथून चंद्रहार पाटीलच विजयी होतील, असे थेटच शालिनीताई पाटील म्हणाल्या.
दरम्यान, महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांनी मिळून सांगलीतून चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. असे असतानाही जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी सांगलीच्या जागेबाबत अग्रही भूमिका कायम ठेवली आहे. तसेच चंद्रहार पाटलांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे कदम आणि विशाल पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.