Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरी, काँग्रेसचे इच्छुक नीलेश संभारे निवडणूक रींगणात

भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरी, काँग्रेसचे इच्छुक नीलेश संभारे निवडणूक रींगणात 


महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला गेल्याने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असहकाराची भूमिका घेतली असतानाच, त्या पाठोपाठ काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनीही निवडणूक लढवणार असल्याचे आता स्पष्ट केले आहे. जिजाऊ विकास पार्टीमधून ही निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करत अडीच लाख मतांनी माझा विजयी होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला. यामुळे भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरी अटळ असल्याचे चित्र आहे.



भिवंडी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड या मतदारसंघाचा समावेश आहे. आगरी, कुणबी, आदिवासी अशा मतदारांचा भारणा असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात २००९ मध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आला होता तर, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. यामुळे काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला होता. काँग्रेस पक्षातून माजी खासदार सुरेश टावरे आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे हे इच्छुक होते. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने या जागेसाठी आग्रह धरला होता. तसेच ही जागा काँग्रेसला मिळाली नाही तर राजीनामा देऊ असा इशारा काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिला होता. अखेर जागा वाटपात भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला गेल्याने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असहकाराची भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्याविरोधात माजी खासदार सुरेश टावरे आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी असहकाराची भूमिका घेतली आहे. तसेच चोरगे हे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून तसे त्यांनी संकेतही दिले होते. तर, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या मार्गावर राहुल गांधी यांच्या स्वागताचे फलक लावून वातावरण निर्मिती केली होती. काँग्रेसकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा दावा सांबरे यांनी केला होता. परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला ही जागा गेल्याने अस्वस्थ झालेल्या सांबरे यांनी जिजाऊ विकास पार्टीमधून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.

ठाण्याच्या किड्यामुळे गडबड

जो राजकीय पक्ष जिजाऊ संस्थेचे काम बघून देईल, त्या तिकिटावर निवडणूक लढवेल असे म्हटले होते. तसेच तिकीट मिळाली नाही तरी ही निवडणूक लढविणार असल्याचे शहापुरच्या सभेत स्पष्ट केले होते. त्यानुसार जिजाऊ विकास पार्टीमधून निवडणूक लढविणार आहे. शिक्षण आणि आरोग्य या विषयावर जिजाऊ संस्था काम करीत असून या विषयावर आणखी काम करायचे आहे. कोणावरही टीका करणार नसून केवळ कामांच्या जोरावर मत मागणार आहे, असे सांबरे यांनी स्पष्ट केले. ठाण्याचा एक किडा असून त्याच्या वळवळीमूळे भिवंडी जागेची गडबड झाली आहे, अशी टीका सांबरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. यानिमित्ताने हा किडा कोण याविषयी चर्चा रंगल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.