सांगली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांनी एकसंघ प्रचाराचा धडाका लावून चंद्रहार पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला.
सांगली मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांच्या नेत्यांची आज सांगलीत बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते, आमदार डॉ. विश्वजीत कदम, शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्यासह सर्वच पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी हातात हात घालून उमेदवार चंद्रहार पाटील यांची विजयश्री खेचून आणण्यासाठी जे जे करावे लागेल, ते करण्याची ग्वाही सर्वच नेत्यांनी दिली. सांगली मतदारसंघात पैलवान चंद्रहार पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अनेक ठिकाणी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकसंघपणे काम केल्यास हे यश सोपे होणार आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. तर, महाविकास आघाडीचा धर्म पाळून यापुढे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी ताकदीने कामाला लागतील, असा विश्वास काँग्रेसचे नेते, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय बजाज, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, जिल्हा संघटक बजरंग पाटील, दिगंबर जाधव, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
शिवसैनिकांकडून प्रचाराचा धडाका
शिवसैनिकांनी चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठय़ा जोमाने कामाला लागले असून, चंद्रहार पाटील यांच्या विजयाची खात्री निर्माण झाली आहे. कार्यकर्ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. सर्वत्र 'एकच वादा, चंद्रहारदादा'चा जयघोष पाहायला मिळत आहे. या प्रचारामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.