नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान देशात राजकीय नेत्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे. 'संघ सुरुवातीपासून आरक्षणाचं समर्थन करतो, मात्र काह लोकांकडून खोटे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. समाजात जोपर्यंत विषमता आहे, तोपर्यंत आरक्षण असलं पाहिजे, असं मोहन भागवत म्हणाले. ते हैदराबादमध्ये बोलत होते.
तेलंगणाच्या हैदराबादमध्ये एका शैक्षणिक संस्थेतील एका कार्यक्रमाला मोहन भागवत यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मोहन भागवत म्हणाले,'मागच्या वर्षी नागपूरमध्ये म्हटलं होतं की, समाजात जोपर्यंत विषमता आहे, तोपर्यंत आरक्षण अबाधित राहील. अदृश्य विषमता ही समाजात आहे'. आरक्षणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाल्यानंतर मोहन भागवत यांनी आरक्षणावर भाष्य केलं आहे.
काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप
मध्य प्रदेशच्या रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी 'काँग्रेस ओबीसींचा सर्वात मोठा शत्रू' अशी टीका केली. काँग्रेसने मागच्या दरवाजातून ओबीसीमध्ये मुस्लिम समाजातील जाती सहभागी करून कर्नाटकात धार्मिक आधारावर आरक्षण दिलं. ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित केलं आहे, असे मोदी म्हणाले. सिद्धरामय्या काय म्हणाले? या वादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं की, 'काँग्रेसने मागासवर्गीयांचं आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं हे खोटं आहे'. तसेच सिद्धरामय्या यांनी भाजपवर टीका केली.'मुस्लिम समाजाला आरक्षण लागू करण्याच्या मुद्द्यावर देवगौडा यांची भूमिका कायम आहे का? की ते नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेपुढे गुढघे टेकतील? त्यांनी कर्नाटकातील लोकांसाठी भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.