Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'सांगली लोकसभेच्या उमेदवारी बाबत नक्कीच चांगली बातमी येईल 'विशाल पाटील यांचं सेनेला बुचकळ्यात टाकणार वक्तव्य

'सांगली लोकसभेच्या उमेदवारी बाबत नक्कीच चांगली बातमी येईल 'विशाल पाटील यांचं सेनेला बुचकळ्यात टाकणार वक्तव्य 


सांगली : 'सांगली लोकसभेच्या  उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल, याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू..' असा निर्धार विशाल पाटील  यांनी शनिवारी समाज माध्यमांवर पत्राद्वारे केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार चंद्रहार पाटील  यांच्या प्रचारानिमित्त भेटीगाठी घेण्यासाठी खासदार संजय राऊत सांगलीत आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हे पत्र 'व्हायरल' झाल्याने चर्चा होत आहे. 'सांगली'च्या जागेवरून महाविकास आघाडीत खटके उडत आहेत. शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्यानंतर या जागेसाठी काँग्रेसही आग्रही आहे. 




आमदार विश्वजित कदम आणि खासदारकीसाठी इच्छुक विशाल पाटील हे पक्षातील वरिष्ठांच्या भेटीगाठी घेत आहेत. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची चर्चाही आहे. काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मात्र विशाल पाटील यांचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात 'आधीच्या काळात तुम्ही पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे राहिलात, याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे की, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. 

तुम्ही दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा,' असा सल्लाही विशाल पाटील यांनी दिला आहे. पत्राच्या सुरवातीलाच म्हटले की, 'मागच्या काही वर्षांत सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहोत. काँग्रेसनेच विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची, असं समीकरणच तयार झालं आहे. 

दिवंगत वसंतदादा पाटील, पतंगराव कदम, गुलाबराव पाटील, प्रकाशबापू पाटील, मदन पाटील, आर. आर. पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, हे तुम्हाला ठावूकच आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लढण्यासाठी आपण सज्ज आहोत. कार्यकर्त्यांत उत्साह दिसतोय. 'सांगली काँग्रेसचीच', या भूमिकेवर कार्यकर्ते ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने विश्वजित कदम प्रयत्न करत आहेत.'

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.