खेळताना विजेचा शॉक लागून समडोळीत पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू
खेळताना विजेचा शॉक लागून समडोळीत पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू सांगली : मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये असणाऱ्या अचानक चौक येथे पाच वर्षांच्या बालकाचा खेळताना विजेच्या खांबाला हात लागल्याने विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरची घटना हि आज शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. देवराज दगडू गवंडी (वय 5 वर्षे सहा महिने रा. समडोळी) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, मृत देवराज गवंडी हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहत होता. आज शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवराज हा गावातील अचानक चौक येथे रस्त्यावर खेळत होता. यावेळी खेळताखेळता देवराज याचा हात विजेच्या खांबाला लागला. त्याला शॉक लागल्याने तो खाली कोसळला. यावेळी त्याठिकाणी असणाऱ्या त्याचे चुलते संजय रामचंद्र गवंडी यांनी त्याला मृत अवस्थेतच सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. अचानक घडलेल्या या घटनेनं गवंडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.