सांगली लोकसभेत विशाल पाटलांना उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. मिरज तालुक्यातील काँग्रेस कमिटी बरखास्त केल्यानंतर संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीवर असणारा काँग्रेसचा शब्द पुसून टाकला आहे. पक्षाकडूनच काँग्रेस संपवण्यात येत असल्याचा आरोप संतप्त कार्यकर्त्यांनी केला आहे.
या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीच्या इमारतीवर चढून पांढरा कलर लावत काँग्रेस हा शब्द पुसून टाकला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असणारा संताप उफाळून येत आहे. त्याचबरोबर विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करावा, अशी आग्रही भूमिका देखील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घेण्यात येत आहे, त्यामुळे विशाल पाटील बंडखोरी करणार असं जवळपास निश्चित मानले जात आहे.
दरम्यान विशाल पाटील समर्थकांनी निवडणुकीचे दोन अर्ज घेतले आहेत. विशाल पाटील यांच्या स्वीय सहाय्यकांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन कोरे अर्ज घेतले आहेत. विशाल पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप विशाल पाटील यांच्याकडून खुलासा करण्यात आलेला नाही, पण अर्ज घेतल्याची माहिती विशाल पाटील यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाआधीच उद्धव ठाकरेंनी सांगली मतदारसंघातून चंद्रहार पाटील निवडणूक लढतील अशी घोषणा करून टाकली, यानंतर काँग्रेस आक्रमक झाली.सांगलीचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेटही घेतली. तसंच सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी मागणी केली. पण जागावाटप जाहीर झाल्यानंतर सांगलीची जागा उद्धव ठाकरेंनाच देण्यात आली. यानंतर विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन वस्तूस्थिती पाहून निर्णय घ्या, अशी विनंती केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.