लोकसभा निवडणुकीआधी महाविकासआघाडीला सांगलीमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. सांगलीच्या जागेवरून मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत.
उद्धव ठाकरेंनी थेट सांगलीची जागा जाहीर केल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाविकासआघाडीमध्ये सांगलीवरून सुरू असलेल्या वादावर अनेकांनी जयंत पाटील यांच्याकडे रोख दाखवला आहे. या सगळ्या वादावर अखेर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'आम्ही 10 जागा घेऊन आघाडी राहावी, ही भूमिका घेतली आहे. सांगलीची जागा आम्ही मागितली नाही. एकत्रित पत्रकार परिषद होऊन निर्णय झाला आहे. भाजपसमोर एकच उमेदवार द्यायचा आमता प्रयत्न आहे. एकास एक उमेदवार झाल्यास भाजपचा पराभव होऊ शकतो. सांगलीलादेखील असंच व्हायला पाहिजे, असं आमचं मत आहे', असं जयंत पाटील म्हणाले.
'सांगलीची जागा शिवसेनेने मागितली होती. भाजप विरोधात एकच उमेदवार विरोधात असावा, असा आमचा प्रयत्न आहे. सांगलीतही तसंच व्हायला हवं, तरच भाजपला हरवणं शक्य आहे. कोल्हापूरबाबती स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे. सांगलीच्या निर्णयाबद्दल मी बोलणं योग्य नाही', असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.'काही लोकांचे हेतू वेगळे असतात, सांगलीच्याबाबतीत मी त्या त्या वेळी सगळं सांगितलं आहे. सगळ्यांनी एकसंधपणा दाखवला पाहिजे. मतांची विभागणी होऊ नये, असं आमचं मत आहे. मी विशाल पाटील यांच्या संपर्कात आहे, त्यांच्याशी बोलणार आहे', असं जयंत पाटील यांनी सांगितलं.'सांगलीच्या बाबत सोशल मीडियावर मला जबाबदार धरलं जात आहे, पण त्यांच्या नेत्यांनी काय केलं हे बघितलं पाहिजे. योग्य लढत व्हावी, हा माझा प्रयत्न आहे. भाजपविरोधात ताकद एकत्र करण्याचं काम केलं पाहिजे. आता काय झालं, हे मी बाहेर सांगणं योग्य होणार नाही. जे लोक माझ्याबाबत वावड्या उठवत आहेत, त्यांनी आत्मचिंतन करावं, एकास एक लढत व्ही, अशी माझी भूमिका आहे', असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.