शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचा 9 लाखांच्या खंडणीनीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तिचा अपहरण करुन हत्या केली.
विमानतळ पोलिसांनी खून करणाऱ्या नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे शहरातील फिनिक्स मॉल समोरुन ३०/०३/२०२४ रोजी भाग्यश्री सुर्यकांत सुडे (वय २२ वर्षे, सध्या रा. स्टांझा लिव्हींग, प्रिसो हाऊस, साकोरेनगर, विमाननगर, पुणे मुळगाव मु.पो.हरंगुळ बुद्रुक, ग्रामपंचायत कार्यालयासमोर, ता. जि. लातूर) मिसिंग झालेबाबत ०२/०४/२०२४ रोजी विमानतळ पोलिस स्टेशन येथे तक्रार प्राप्त झाल्यानंतर विमानतळ पोलिस स्टेशन यांनी लागलीच मिसींग मुलींचा शोध सुरु केला होता. ०२/०४/२०२४ व ०३/०४/२०२४ रोजी सदर मुलीच्या मोबाईल वरुन मुलीच्या वडीलांना मिसिंग मुलीचे अपहरण केले असून तिला सुरक्षित परत घरी पाहिजे असल्यास तिच्या बदल्यात ०९ लाख रुपये मुलीच्या बँक खात्यात जमा करणेबाबतचा मेसेज प्राप्त झाल्याने लागलीच मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारी वरुन विमानतळ पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १५७/ २०२४ भादवि ३६४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भाग्यश्रीच्या मोबाईल फोनवरुन प्राप्त मेसेजचे तांत्रिक विश्लेषण केले असता, सदचा मेसेज हा मुंबईतील जोगेश्वरी परिसरातुन केल्याचे समजल्याने तात्काळ वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पोलिस पथक मुंबई भागात मुलींचा शोध घेणेकामी रवाना केले. त्यानंतर ०४/०४/२०२४ रोजी मुंबई परिसरात वर नमुद प्रमाणे मुलीच्या मोबाईल क्रमांकवरुन मुलीच्या वडीलांना मेसेज प्राप्त झाल्याने सदर गुन्ह्यातील अपहृत मुलीचा व पाहिजे आरोपी यांना शोध मुंबई परिसरात घेतला परंतु उपयुक्त माहिती मिळाली नव्हती.
सदर तपासा दरम्यान मुलींचे बँक खात्याची व मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी शिवम फुलवळे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. दाखल गुन्ह्याचे तपास कामी आरोपी शिवम फुलवळे यास वाघोली, पुणे येथुन ताब्यात घेण्यात आले. शिवम फुलवळे याचेकडे करण्यात आलेल्या तपासामध्ये सदरचा गुन्हा त्याने त्याचे दोन साथीदार सुरेश इंदुरे व सागर जाधव यांचे मदतीने सदरचा गुन्हा प्रथमदर्शनी खंडणीसाठी केला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने लागलीच सुरेश शिवाजी इंदुरे व सागर रमेश जाधव या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान आरोपी शिवम फुलवळे याने भाग्यश्री सुडे हिला गाडीमध्येच ठार मारुन, तिचा मृतदेह त्याचे दोन साथीदारांचे मदतीने पुणे नगर हायवेवर असणाऱ्या कामरगाव (ता. जि. अहमदनगर) गावचे हद्दीमध्ये मोकळ्या जागेमध्ये खड्डा खोदुन मृतदेह ज्वालाग्रही पदार्थाचे सहाय्याने जाळुन पुरला असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तहसीलदार, अहमदनगर तालुका, वैद्यकिय अधिकारी, जिल्हा रुग्णालय अहमदनगर व सरकारी पंच यांचे समक्ष आरोपीने दाखविलेल्या ठिकाणी उत्खनन करुन सदरचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे. सदरचे मृतदेह ताब्यात घेवुन शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटल, पुणे येथे पाठविण्यात आलेला आहे.
सदरचा गुन्हा हा आरोपी…
१) शिवम माधव फुलवळे वय २१ वर्ष रा. ऑक्सी हेवन सोसायटी, फ्लॅट नंबर ६०६, रायसोन कॉलेज जवळ वाघोली पुणे२) सुरेश शिवाजी इंदोरे वय २३ वर्ष रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण होस्टेल मुंबई मुळ रा. सकनुर ता. मुखेड जि. नांदेड३) सागर रमेश जाधव वय २३ वर्ष रा. मु. कासलेवाडी पो. हलकी ता. शिरोळा, अनंतपाळ जि. लातुर यांनी संगणमत करुन पैशाचे लालसे पोटी केला असल्याचे प्रथमदर्शनी तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. दाखल गुन्ह्याचा तपास सरु असुन, पुढील तपास सर्जेराव कुंभार पोलिस निरीक्षक गुन्हे विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
खूनानंतर खंडणीची मागणी…
भाग्यश्रीचे ज्या दिवशी अपहरण करण्यात आले, त्याच दिवशी तिचा खून आरोपींनी केला. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी तिच्या मोबाईलवरून मेसेज करून 9 लाखांच्या खंडणीची मागणी केली. भाग्यश्रीचा मोबाईल आरोपींकडे होता. आरोपी आईचा मॅसेज आल्यानंतर तिच्याशी बोलत होते. दोन दिवसांनी म्हणजे, 2 एप्रिल रोजी आरोपींनी तिच्या कुटूंबियांशी संपर्क साधत खंडणी मागितली. तसेच, पैसे न दिल्यास तिचे तुकडे करू अशीही धमकी दिली. त्यानंतर कुटूंबाने पोलिसांकडे धाव घेत याबाबत तक्रार दिली. विमानतळ पोलिसांसह गुन्हे शाखेकडून भाग्यश्रीचा शोध सुरू केला होता. तिचे लोकेशन वेगवेगळे होत होते, त्यानूसार पोलिस शोध घेत होते.
आईला वाढदिवसाला जात असल्याचे सांगितले…
भाग्यश्रीने 30 मार्च रोजी आईला फोनकरून मी, मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी विमाननगरमधील फिनिक्स मॉलमध्ये जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर 31 मार्च रोजी तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले होते.
एकुलती एक भाग्यश्री..
सुडे कुटूंबिय मुळचे लातुर जिल्ह्यातील आहे. वडिल लातूर जिल्ह्यातील मोठे शेतकरी आहेत. त्यांना भाग्यश्री व एक मुलगा आहे. भाग्यश्रीला मोठं शिक्षण देण्याचे त्यांचे स्वप्न होते. भाग्यश्रीही हुशार होती. परंतु, मित्रावर अतिविश्वास तिच्या जिवावर बेतला अन् तिचा घात झाला.
असा झाला खूनाचा उलगडा…
गुन्ह्यापासून वाचण्यासाठी शिवम याने पुर्ण खबरदारी घेतली होती. त्याने आपल्या दोन मित्राला पैशाचे प्रलोभन दाखवले. त्यातील एकाने शिवम याला विचारले देखील होते. हे गंभीर आहे म्हणून, त्यावेळी त्याने आपण भाग्यश्रीला घाबरवत आहोत असे सांगितले. एकदा का पैसे मिळाले की संपले असे तो सांगत होता. मात्र शिवमच्या सैतानी डोक्या वेगळाच गेम सुरू होता. झुम कार भाड्याने घेण्यापासून ते भाग्यश्रीचे अपहरण, खून, मृतदेहाची विल्हेवाट ते खंडणीची मागणी याबाबत खबरदारी घेतली. मात्र त्याने केलेली एक चुक पोलिसांच्या नजरेत आली अन् त्याच्या पापाचा घडा फुटला. खंडणीचे पैसे शिवम भाग्यश्रीच्या बँक खात्यावर मागत होता. त्यासाठी त्याने भाग्यश्रीच्या फोन पेचा अॅक्सेस आपल्याकडे घेतला. तो घेताना त्याने मोबाईल क्रमांक मात्र आपला दिला होता.
ही प्रक्रिया करत असताना, जनरेट झालेला पिन त्याच्या मोबाईलवर आला. त्याचवेळी पोलिसांना शिवम याचा संपर्क क्रमांक मिळाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने तो मी नव्हेच अशी भुमिका घेतली. याचवेळी दुसर्या पथकाला सुरेश आणि सागर या दोघांची माहिती मिळाली. आता तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी आपला पॅटर्न राबविला. त्याचवेळी आरोपींनी भाग्यश्रीचा खून केल्याचे सांगितले.विमानतळ पोलिसांनी कौशल्यपुर्वक तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या. 9 लाखाच्या खंडणीसाठी भाग्यश्रीचे अपहरण केल्याचे आरोपी सांगत आहेत. मात्र त्यांनी भाग्यश्रीचा खून करून खंडणीची मागणी केली आहे. त्यामुळे याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, सर्जेराव कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन उपनिरीक्षक चेतन भोसले, अंमलदार, सचिन जाधव, गणेश इथापे, राकेश चांदेकर, शैलेश नाईक, रुपेश तोडेकर, अस्मल अत्तार, किरण खुडे, अंकुश जोगदंडे,योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, दादासाहेब बर्डे, ज्ञानेश्वर आवारी,अविनाश कोंडे यांच्या पथकाने केली.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त पुणे शहर प्रविण पवार, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील पोलिस उप आयुक्त विजयकुमार मगर, सहा पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विमानतळ पोलिस स्टेशन, पुणे शहर आनंदराव खोबरे पोलिस निरीक्षक गुन्हे सर्जेराव कुंभार, सपोनि विजय चंदन, पोउनि चेतन भोसले, पोलिस कर्मचारी अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, गणेश इथापे, सचिन जाधव, राकेश चांदेकर, शैलेश नाईक, रुपेश तोडेकर, उमेश धेंडे, रिहान पठाण, ज्ञानेश्वर आवारी, किरण खुडे यांनी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.