मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना उत्तम कामगिरीसह उल्लेखनीय आणि प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र जाहीर करण्यात आले आहे. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सहीने शुक्रवारी तब्बल ८०० जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सांगली शहरचे तत्कालीन पोलिस निरीक्षक तसेच सध्याचे पुणे ग्रामीण येथील जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनाही पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र जाहीर करण्यात आले आहे.
निरीक्षक देशमुख मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील खुजगाव येथील आहेत. जुलै २००५ मध्ये ते राज्य पोलिस दलात उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यानंतर २००६ ते २००७ या काळात त्यांनी गडचिरोली येथे सेवा बजावली. गडचिरोली येथे सेवेत दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी एका नक्षलवाद्याचा एनकाऊंटर केला होता. २००७ ते २००८ या काळात त्यांनी ठाणे ग्रामीण येथे सेवा बजावली. २००८ ते २०११ या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पोलिस ठाण्यात काम केले आहे.
२०११ ते २०१७ या काळात त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये सेवा बजावली. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत त्यांनी सेवा बजावली तर गांधीनगर आणि गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. गोविंदराव पानसरे, कलबुगीर् आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या खून प्रकरणी नेमण्यात आलेल्या एसआयटीमध्येही त्यांनी उत्कृष्ट तपास केला.पानसरे हत्याकांडातील पहिल्या संशयिताला निरीक्षक देशमुख यांनी अटक केली होती. २०१७ ते २०१९ या काळात त्यांनी सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग, मिरज वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी म्हणूनही सेवा बजावली आहे. २०१९ ते २०२१ या काळात त्यांनी तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात काम केले. २०२२ ते २०२४ या काळात ते सांगली शहर पोलिस पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून काम केले आहे. सध्या ते पुणे ग्रामीण पोलिस दलात जिल्हा विशेष शाखेत सेवा बजावत आहेत. निरीक्षक देशमुख यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.