काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर, उद्धव ठाकरेंची सभा संपताच दोन नेत्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
खामगाव येथे महाविकास आघाडीची सभा संपताच काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व काँग्रेस सेवादलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. या घटनेनं काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ काल खामगाव येथील जे.व्ही. मेहता महाविद्यालयाच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील व स्थानिक महाविकास आघाडीचे नेते मंचावर उपस्थित होते. उध्दव ठाकरे यांचे भाषण संपताच नेते आपल्या मार्गाने निघाले.
सुरुवातीला दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक
दरम्यान काही वेळातच खामगाव मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा सभास्थळावरून बाहेर पडत असताना समोरून काँग्रेस सेवादालचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांची गाडी तेथे आली. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली.
शाब्दिक वादाचे रुपांतर धक्काबुक्कीत
काही वेळाने या शाब्दिक वादाचे रुपांतर धक्काबुक्कीमध्ये झाले. यावेळी काही कार्यकर्ते तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या अंगावर धावून गेले. तसेच त्यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्या. या घटनेमुळे सभास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण सोडविले. या घटनेमुळे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
बुलढाण्यात ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका
बुलढाणा येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूका जवळ येत आहेत. पर्वा पहिला टप्पा पार पडला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांवर संकट आले तेव्हा कधीतरी तुमची चौकशी करायला नरेंद्र मोदी आले होते का? आता ते सगळीकडे फिरत आहेत. कारण त्यांना सर्वांना रामराम करायचाय. तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा, अशी मोदींची अवस्था आहे. आज मी काय खायचं ते सांगा. 2047 सालचे कशाला सांगतात, अशी टीका त्यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.