हृदयरोगग्रस्त बालके उपचारांसाठी मुंबईला रवाना
सांगली, ता. ३१ : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामधून २० हृदयरुग्ण बालकांना गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील बालाजी हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले. सुमारे ९० लाख रुपये खर्चाच्या या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकरी अधिकारी तृप्ती घोडमिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी या बालकांना शुभेच्छा देऊन रवाना केले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत इको तपासणी शिबिरामधून २०५ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ६० लाभार्थ्यांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदर्शनास आले आहे. यातील ४० लाभार्थ्यांची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रलंबित २० लाभार्थ्यांची खर्चिक व गुंतागुंतीच्या ओपन हार्ट शस्त्रक्रिया तत्काळ मोफत करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी पाठपुरावा केला. बालाजी हॉस्पिटल येथे या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
'आयुष्यमान भव' या शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत या शस्त्रक्रिया पूर्ण करणेत येणार आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, धर्मादाय संस्था, खासगी रक्कमदाते यांच्या सहकायनि या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. त्यासाठी रुग्णांना व त्यांच्या पालकांना स्वतंत्र बसने मुंबईला पाठवण्यात आले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी सर्व लाभार्थ्यांना सेवा देण्यासाठी, तसेच आरोग्य संस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. लाभार्थी व पालकांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. उत्कर्ष भोसले, जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहायक अनिता हसबनीस, महेंद्र खोत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे व 'डीईआयसी'चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.