नागपूर : मारकुंड्या नवऱ्याच्या छळामुळे कंटाळून बहिणीकडे निघालेल्या एका महिलेचे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण करून 'फटफटीवाल्या' नराधमाने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. स्वत: तोंड काळे केल्यानंतर त्याने त्याच्या साथीदाराकडूनही या महिलेवर बलात्कार करवून घेतला. तिरोडा रेल्वे स्थानकाजवळच्या जंगलात ही संतापजनक घटना घडली.
पीडित महिला (४८) वर्षांची असून ती गोंदिया जिल्ह्यातील एका गावखेड्यात राहते. तिचा पती तिला नेहमी मारहाण करतो. सततच्या मारहाणीमुळे तिची प्रकृती बिघडल्याने ती बिचारी एकटीच येऊन तिरोड्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल झाली. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर तिला डॉक्टरांनी शुक्रवारी २६ एप्रिलला दुपारी सुटी दिली. घरी गेली तर मारकुंडा नवरा परत तुटून पडेल, खायला मिळणार नाही. पुन्हा प्रकृती खालावेल, या भीतीपोटी ती महिला मध्य प्रदेशात राहणाऱ्या बहिणीच्या घरी जाण्याच्या विचाराने तिरोडा रेल्वे स्थानकावर आली. फलाटावरच्या पानपोईजवळ ती बसली असताना दुपारी ३ च्या सुमारास एक व्यक्ती तिच्याजवळ आला.
'येथे कशाला बसली, कुठे जायचे आहे', अशी विचारणा करू लागला. महिलेने त्याला 'भला माणूस' समजून कैफियत ऐकवून मध्य प्रदेशातील बहिणीकडे जायचे आहे, असे सांगतिले. त्या नराधमाने येथून मध्य प्रदेशात कुठलीही गाडी जात नाही, असे सांगून मी तुला तेथे पोहचवून देतो, असे म्हणत आपल्या मोटरसायकलवर बसवले. प्रारंभी त्याने बाजुच्या गावातील मामांच्या घरी नेले. तेथे त्याच्या मामाला संशय आल्याने त्यांनी या महिलेला जेथून आणले तेथे ताबडतोब नेऊन सोड, असे सांगितले. त्यामुळे हा नराधम तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला. महिलेने घरात जाण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिला पुन्हा मोटरसायकलवर बसवून रात्री ११ च्या सुमारास बाजुच्या जंगलात नेेले. तेथे तणसाच्या ढिगाऱ्यावर त्याने दोनदा तिच्यावर बलात्कार केला. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर शेतातील रामू नामक साथीदाराला आवाज देऊन त्याच्याकडूनही बलात्कार करवून घेतला. भयाण रात्री तिला तशाच अवस्थेत सोडून दोन्ही आरोपी तेथून पळून गेले.
गावकऱ्यांनी केली मदत
प्रचंड घाबरलेली अत्याचारग्रस्त महिला सैरावैरा पळत रस्त्यावर आली. तेथे तिला गावकरी दिसले. त्यांना तिने आपबिती सांगितली. त्यांनी लगेच दवणीवाडा पोलिसांना कळविले. घटना रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील असल्यामुळे दवणीवाडा पोलिसांनी पीडित महिलेला गोंदिया रेल्वे पोलिसांकडे नेले. तेथे पीडितेच्या तक्रारीवरून शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
'फटफटीवर' वरून आरोपीचा छडा -
पडित महिला अत्यंत भोळी आहे. ती आरोपीला ओळखत नव्हती. तो फटफटीवर होता, एवढीच माहिती तिने पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे मोटरसायकलचा नंबर मिळवला आणि त्या आधारे मुख्य आरोपी तसेच त्याच्या साथीदाराच्या शनिवारी रात्री मुसक्या बांधल्या. दरम्यान, या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून, रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठांकडून प्रकरणाच्या तपासावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.