"माझी आणि माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल तर, माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी आहे. फक्त शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसने उघडपणे येऊन सांगावे. मान्य आहे माझ्याकडे कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही. महाराष्ट्रातील मी एकमेव उमेदवार असेन ज्याची उमेदवारी चार वेळा जाहीर होऊनही मविआ मधील काही घटक पक्ष अजूनही आमच्या पासून लांब आहेत", असे ठाकरे गटाचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील म्हणाले. सांगलीत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांचा मुलगा खासदार होतोय हे दुखणे आहे
चंद्रहार पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचा मुलगा खासदार होतोय हे दुखणे आहे की शिवसेनेचा खासदार होणार आहे हे दुखणे आहे हे मला कळेना. हे सर्व पाहून माझ्या मनाला खूप वेदना होतात. महाराष्ट्रातील मी एकमेव उमेदवार असेन ज्याची उमेदवारी चार वेळा जाहीर होऊनही मविआ मधील काही घटक पक्ष अजूनही आमच्या पासून लांब आहेत.
महाविकास आघाडीकडून सांगलीची जागा ठाकरे गटाला
महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभेची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली आहे. मात्र, या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये तणाव आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील सांगलीची जागा लढवण्यावर ठाम आहेत. आज त्यांनी सांगलीतून उमेदवारी अर्जही भरलाय. मात्र, हा अर्ज त्यांनी काँग्रेसकडून नाही तर अपक्ष भरला आहे.
सांगलीतील काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर बहिष्कार
काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी अद्याप माघार घेतलेली नाही. त्यामुळे सांगलीत आज पार पाडणाऱ्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेस बहिष्कार टाकलाय. शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात हजर आहे, मात्र, विशाल पाटलांच्या नेतृत्वातील सांगलीच्या काँग्रेसने महाविकास आघाडीच्या मेळाव्याला दांडी मारली आहे.
विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी, सांगलीतील काँग्रेस आक्रमक
सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे समर्थक देखील प्रचंड आग्रही आहेत. विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी पत्र लिहले. तसेच रक्ताने लिहलेले पत्र विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या समोर झळकवण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.