महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केली.
यावेळी त्यांनी जागावाटपाबाबत अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला त्यांच्या चिन्हावरुन मनसे उमेदवाराने निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे महायुतीत जाण्याबाबतची बोलणी फिस्कटल्याचं त्यांनी जाहीर केलं. पण आता सूत्रांकडून मोठी बातमी समोर येत आहे. मनसेचा महायुतीतला प्रवेश हा कमळ चिन्हामुळे नाही तर धनुष्यबाणामुळे फिस्टकल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ताज लँड्समधील बोलणी फिस्कटली. त्यामुळे मनसेचा महायुतीत प्रवेश होऊ शकला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढावी, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव होता. शिंदे धनुष्यबाणाच्या चिन्हासाठी आग्रही होते. पण इंजिन सोडून दुसऱ्या कुठल्याही चिन्हावर लढणार नाही, या भूमिकेवर राज ठाकरे ठाम होते. त्यांनी कालच्या भाषणाबाबत उल्लेख केला. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. मनसेच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढावी, असा कुठलाही प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला नव्हता, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
पडद्यामागे नेमक्या काय हालचाली घडल्या?
राज ठाकरे काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. राज ठाकरे यांनी दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. ही भेट 19 मार्चला झाली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत मनसेला 2 जागा देण्याबाबतचा प्रस्ताव होता. मनसेला दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई देण्याची चर्चा झाली. दिल्लीत झालेली बैठक सकारात्मक होती. यानंतर मुंबईत राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हॉटेल ताज लँड्समध्ये बैठक पार पडली. सूत्रांच्या माहितीनुसार, याच बैठकीत मनसेच्या महायुतीत प्रवेशाबाबतची बोलणी फिस्कटली.बोलणी फिस्टकण्यामागे मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाणावर लढावं हा प्रस्ताव होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाणावर लढावं या भूमिकेवर आग्रही होते. तर दुसरीकडे मनसेचे उमेदवार इंजिन सोडून दुसऱ्या चिन्हावर लढू नये यावर राज ठाकरे ठाम होते. विशेष म्हणजे राज ठाकरे यांना राज्यसभा आणि विधान परिषदेचीही ऑफर देण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.