भारतातल्या 'या' गावात कोणीही बांधू शकत नाही दुमजली घर; काय आहे कारण?
नवी दिल्ली : भारतात आजही गावखेड्यांमध्ये जुन्या रूढी, परंपरा चालू आहेत. अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात आणि त्या गावकरी पाळतात. असंच एक गाव आहे, जिथं कोणीही दुमजली घर बांधू शकत नाही. चंडीगडजवळ हे गाव आहे. इथं कोणीही दुमजली घर बांधण्याचा प्रयत्न केला की नुकसान होतं. छतावर कोणतंही बांधकाम करता येत नाही. याच कारणाने गावात जयंतीदेवींचं मंदिर बांधण्यात आलं आहे. या गावात दुसरा मजला का बांधता येत नाही, यामागची प्रचलित कथा जाणून घेऊ या.
प्राचीन काळी बाबरच्या राजवटीत एक हिंदू राजपूत हथनौरचा राजा होता. त्याच्या एका भावाचं लग्न हिमाचलमधल्या कांगडा इथल्या राजाच्या मुलीशी झालं होतं. कांगडाची राजकुमारी माता जयंतीदेवीची मोठी भक्त होती. देवीची पूजा करून आणि दर्शन घेतल्यानंतरच ती दररोज आहार घ्यायची. लग्नावेळी राजकुमारी म्हणाली, की ‘माता मी तुमच्यापासून इतकी दूर कशी राहीन.’ त्यावर देवीने तिला आश्वासन दिलं, की ‘तुझी डोली व माझी डोली एकत्रच उठेल.’ (एकत्र दोघींची विदाई होईल.); पण लग्नानंतर डोली उठू न शकल्याने सर्व जण काळजीत पडले. यानंतर राजकुमारीने तिच्या वडिलांना स्वप्नात देवीने सांगितलेल्या गोष्टी सांगितल्या. यानंतर माता जयंतीची डोलीही सजवण्यात आली. राजकुमारी आणि जयंती देवींची पालखी हथनौरमधून एकत्र निघाली आणि राजाने सोबत पुजारीही पाठवले. आतापर्यंत याच घराण्यातल्या पुजारी माता जयंतीची पूजा करत आहेत. काही वर्षांनी राजा-राणी मरण पावल्यावर पुढच्या पिढ्यांनी मातेची पूजा करणं बंद केलं. त्या काळात मनी माजरा इथल्या जंगलात एक डाकू राहत होता. तो माता जयंतीदेवीचा मोठा भक्त होता. देवीने डाकूला दर्शन दिलं होतं, त्यानंतर त्यानं तिथे देवीचं मंदिर बांधलं, असं म्हटलं जातं.
जयंती नदीच्या काठावर मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. देवीच्या वर कोणीही जाऊ शकत नाही असं तिचं म्हणणं आहे, असं मंदिराच्या पुजाऱ्याच्या हवाल्याने एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय. राणीच्या पुढच्या पिढ्यांनी देवीची पूजा करणं बंद केल्यावर देवीने दरोडेखोराच्या स्वप्नात येऊन त्याला राज्याचा नाश करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून देवीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आजही घराच्या वर दुसरा मजला बांधला जात नाही. कोणी दुसरा मजला बांधण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या बाबतीत काही तरी वाईट घडतं. गावातल्या लोकांनी आजवर अनेकदा एकत्र येऊन पूजापाठ केले आणि घरावर दुसरा मजला बांधण्याची परवानगी देवीकडे मागण्यात आली. तिथे हो व नाही अशा चिठ्ठ्या टाकल्या; पण चिठ्ठी उचलल्यावर दर वेळी ‘नाही’ असंच उत्तर आलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.