नवी दिल्ली: 'घड्याळ' चिन्ह वापराच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला कठोर शब्दांत खडसावले आहे. न्यायालयाने चिन्ह वापरासंदर्भात दिलेल्या आदेशांचे अजित पवार गटाकडून पालन होत नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
'घड्याळ' हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचे प्रत्येक जाहिरातींमध्ये नमूद करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १९ मार्च रोजीच्या सुनावणीवेळी स्पष्ट केले होते. मात्र अजित पवार गटाकडून या आदेशाचे पालन होत नसल्याचे शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्या. सूर्यकांत आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर, 'आमच्या आदेशाचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये,' असे सांगत न्यायालयाने अजित पवार गटाची खरडपट्टी काढली.
अजित पवार गटाच्या बाजूने ॲड. मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. 'निवडणूक आयोगाच्या आदेशावर स्थगिती नाही, त्यामुळे आम्ही प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे लिहीत आहोत. फक्त आदेशातील शेवटची ओळ बदलण्यात यावी,' असे रोहतगी म्हणाले. यावर, आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रातील जाहिराती सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. गेल्या महिन्यात देण्यात आलेल्या आदेशाचे पालन निवडणुका पार पडेपर्यंत केले जावे, असेही न्यायालयाने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून दाखल याचिकेवर ही सुनावणी होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.