Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बी जे मेडिकल कॉलेज रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात

बी जे मेडिकल कॉलेज रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात 


पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींवर रॅगिंग झाल्याचा प्रकार समोर आला होता. आता अधिष्ठात्यांनी रॅगिंग झालेच नसल्याचा दावा केला. मात्र, दोनच दिवसांपूर्वी तक्रारदार विद्यार्थिनी आणि रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थिनींसोबत त्यांच्या पालकांची बैठक अधिष्ठात्यांनी घेतल्याचे उघड झाले आहे. या बैठकीत दोषी विद्यार्थिनींना केवळ समज देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याच्या प्रयत्न करण्यात आला.

रॅगिंगची ही घटना गेल्या महिन्यात घडली. याप्रकरणी क्ष-किरणशास्त्र विभागात वैद्यकीय पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तक्रार दिली होती. ही विद्यार्थिनी सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी असून, ती आता पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तिने तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी रॅगिंग प्रतिबंधक समितीने चौकशी करून आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे सादर केला.

याबाबत आता अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी घूमजाव केले आहे. सुरुवातीला रॅगिंग प्रकरणी तक्रार आल्याचे डॉ. काळे यांनी कबूल केले होते. त्यानंतर डॉ. काळे यांनी संबंधित प्रतिनिधीला संदेश पाठवून रॅगिंगचा प्रकार घडला नसल्याचा दावा केला. याबाबत डॉ. काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास अथवा भेटण्यास नकार दिला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांना अधिष्ठात्यांनी दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयात बोलाविले होते. त्यावेळी ज्यांच्या विरोधात तक्रार आहे अशा विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनाही बोलावण्यात आले होते. या बैठकीत डॉ. काळे यांनी दोषी विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना समज दिली. याचबरोबर तक्रारदार विद्यार्थिनीच्या नातेवाईकांना असा प्रकार पुन्हा घडणार नाही, याची हमीही दिली.

महाविद्यालय प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालय मागील काही काळापासून चुकीच्या घटनांमुळे चर्चेत आहे. महाविद्यालयात वारंवार घडणाऱ्या गैरप्रकारांमुळे त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. त्यातच आता गेल्या महिनाभरात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर रॅगिंग झाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रॅगिंगचा गंभीर प्रकार घडूनही महाविद्यालय प्रशासनाकडून या दोन्ही प्रकारांबाबत मौन बाळगून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी आमच्यासमोर रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थिनींना समज दिली. याचबरोबर भविष्यात असा प्रकार घडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. यानंतर माझ्या पुतणीला होणारा त्रास थांबला आहे. – रॅगिंग झालेल्या मुलीचे चुलते

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.