भाजपने शिंदे गटाच्या गळ्यात पट्टा बांधल्याने नेतृत्व ताळतंत्र सोडून वागत असल्याने पदाधिकार्यांत संतापाचा कडेलोट होत आहे. त्यातच आज पालकमंत्र्यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी न मिळाल्याने मिंधे गटाच्या पदाधिकार्यांनी सदस्य नोंदणीच्या फॉर्मची होळी केली. या फॉर्मवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे छायाचित्र असल्याचे भानही त्यांना राहिले नाही. या भयंकर घटनेने मिंध्यांची आपल्या दैवतांवर असलेल्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिंधे गटाचे जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत लोकसभेच्या तिकिटासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. भावी खासदार म्हणून त्यांनी वावरही वाढवला होता. काकाचे मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या वजनामुळे धनंजय यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, ऐनवेळी धाराशिवची जागा अजित पवार यांच्या गटाला देण्यात आली. अजित पवार गटाने भाजपचे आमदार राणा जगजितिंसह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना तातडीने प्रवेश देऊन धाराशिव लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद नसताना देखील त्यांना ही जागा सोडण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा तिळपापड झाला आहे. सावंत यांच्यावरची निष्ठा व्यक्त करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते अनेक हास्यास्पद प्रकार करू लागले आहेत. त्यातच काल वाशी येथील मिंधे गटाच्या प्रमुख पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी मिंधेंवरील रोष व्यक्त करताना भरचौकात शिवसेनेच्या सदस्य नोंदणी फार्मची होळी केली. या फॉर्मवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो असल्याचे भानही त्यांना राहिले नाही.
शिवसेनाप्रमुख, दिघे की तानाजी सावंत यांच्यावर निष्ठा?
जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पदाधिकार्यांची हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर की केवळ तानाजी सावंत यांच्यावर निष्ठा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना फोडली त्यावेळी विचारांचा वारसा सांगणार्या या पदाधिकार्यांना होळी करताना फॉर्मवरील फोटो दिसला नसेल का ? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.