''सांगलीत बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे २२ एप्रिल रोजी आपली उमेदवारी मागे घेतील,'' असा विश्वास शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. ''महाविकास आघाडीच्या धोरणाविरोधात कुणी बंडखोरी करत असेल आणि आघाडीतील पक्षाचे लोक त्याला मदत करणार असतील तर त्याविरोधात कडक भूमिका घेतली पाहिजे. बंडखोराची हकालपट्टी केली पाहिजे,'' अशी भूमिका मांडत खासदार संजय राऊत यांनी विशाल पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगलीच्या विषयावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका मांडताना काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. खासदार राऊत म्हणाले, ''कुणी बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या विरोधात काम करीत असेल तर त्या पक्षाने कारवाई केली पाहिजे. अमरावतीत दिनेश बूब यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याआधी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला.एखादा महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेत असेल आणि आघाडीतील लोक त्याच्यासोबत उभे राहत असतील तर योग्य नाही. शिस्तभंगाची भूमिका घ्यायला हवी. त्या पक्षाने संबंधितांची हकालपट्टी करायला हवी.'' नाना पटोले यांनी सांगलीसाठी काँग्रेसचा एबी फॉर्म तयार आहे, शिवसेनेने विचार करावा, असा प्रस्ताव मांडला होता.
त्यावर संजय राऊत म्हणाले, ''कुणाची ताकद किती हे लोक ठरवतील. गेल्या दहा वर्षांत सांगलीत आमदार, खासदार भाजपचे निवडून येतात. काँग्रेसचा बालेकिल्ला, काँग्रेसची परंपरा असताना मोक्याच्या ठिकाणी भाजप, संघ परिवाराचे लोक निवडून येतात, याला मी त्या पक्षाची ताकद मानत नाही. जर भाजपला टक्कर द्यायची असेल तर शिवसेना उभी राहायला हवी, अशी आमची भूमिका आहे.''
'विशाल माघार घेतील'
''सांगलीत बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे २२ एप्रिल रोजी आपली उमेदवारी मागे घेतील,'' असा विश्वास शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ''विशाल पाटील चांगले नेते आहेत. मात्र, सांगलीची जागा शिवसेनेला सुटलेली आहे. तेथे भाजपचा पराभव करण्यासाठी एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे. विशाल पाटील शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी राहतील.''
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.