मित्राच्या बायकोकडे टक लावून का पाहतोस? असा जाब विचारल्याने दोघांवर चाकू हल्ला
कल्याण रेल्वे स्थानकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेकडे टक लावून पाहणाऱ्या व्यक्तीने दोन जणांवर हल्ला केला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. कल्याण रेल्वे स्टेशनच्या बूकिंग काऊंटरवर ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याण रेल्वे स्टेशनवरील बूकिंग काऊंटरजवळ एक व्यक्ती आपल्या पत्नी आणि एका मित्रासोबत उभा होता. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती त्या व्यक्तीच्या पत्नीकडे टक लावून पाहत होता. हे पाहून त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या मित्राने या अज्ञात व्यक्तीला हटकले. तसेच माझ्या मित्राच्या पत्नीकडे टक लावून का पाहतोस? असा जाब सुद्धा त्या व्यक्तीला विचारला.
या घटनेनंतर हा अज्ञात आरोपी संतापला आणि त्याने आपल्याकडील चाकू काढत त्या व्यक्तीवर हल्ला केला. हे पाहून त्याचा मित्र आणि पीडित महिलेचा पती मध्यस्थी करण्यासाठी गेला. मात्र, आरोपीने त्याच्यावर सुद्धा चाकू हल्ला केला. या हल्ल्यात पीडित महिलेचा पती आणि त्याचा मित्र असे दोन्हीही जखमी झाले आहेत. रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आणि एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव अरुण कांबळे असे आहे. आरोपी अरुण कांबळे याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. कल्याण रेल्वे स्टेशनच्या बूकिंग काऊंटर जवळ आरोपी अरुण कांबळे हा उभा होता. त्याच्या काही अंतरावर पीडित महिला ही आपला पतीसोबत उभी होती. त्या पतीच्यासोबत त्यांचा एक मित्र सुद्धा होता. आरोपी अरुण कांबळे हा या महिलेकडे वारंवार टक लावून पाहत होता. हे पाहून महिलेच्या सोबत उभ्या असलेल्या तिच्या पतीच्या मित्राने अरुण कांबळे याला हटकले.
मात्र, आपल्याला जाब विचारल्याने आरोपी अरुण कांबळे संतप्त झाला आणि त्याने आपल्याकडील चाकू काढून हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच जीआरपी घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी अरुण कांबळे याला अटक केली. आरोपी अरुण हा खडवली येथे राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.