किरकोळ वादातून कवलापूर (ता. मिरज) येथील रितेश सुनील सावंत (वय 22) या तरुणास भोसकण्यात आले. त्याचा मित्र राहुल माने याच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. गावातील मायाक्का मंदिरामागे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली.
याप्रकरणी तिघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर उर्फ लालू दत्तात्रय पवळ, ताजुद्दीन इलाही मुल्ला व किरण पुंडलिक शिंदे (तिघे रा. कवलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील मुल्लाला अटक करण्यात आली आहे. जखमी रितेश सावंत याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या छातीत व पोटावर वर्मी घाव बसला आहे.रितेश सावंत व राहुल माने सोमवारी रात्री कामानिमित्त मायाक्का मंदिर परिसरात गेले होते. तिथे संशयित थांबले होते. संशयित किरण शिंदे याने राहुलला 'तू आमच्या घराजवळ येऊन शिव्या का देतोस', अशी विचारणा केली. त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. संशयितांनी किरणच्या हातावरच्या चाकूने वार केला. हा प्रकार पाहून रितेश मारामारी सोडवण्यासाठी पुढे गेला.
त्यावेळी लालू पवळ याने 'आज रित्याला सोडायचे नाही, त्याला लय मस्ती आली आहे', असे म्हणून रितेशच्या पोटात डाव्या बाजूला व छातीत धारदार शस्त्राने भोसकले. रितेश रक्ताच्या थारोळ्यात पडतात संशियत पळून गेले. परिसरातील लोकांनी रितेश व राहुलला उपचारासाठी हलविले. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. संशयितांच्या शोधासाठी मध्यरात्री त्यांच्या घरावर छापे टाकले. यातील फक्त मुल्ला सापडला. रितेशवर मध्यरात्री शस्त्रक्रिया करण्यात आली.
पवळ रेकॉर्डवरील गुंड
संशयित लालू पवळ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध सातारा जिल्ह्यात दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. आता तो सांगली पोलिसांच्याही रेकॉर्डवर आला आहे. त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.