Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गर्भपातासाठी आलेली इस्लामूपरची महिला सीपीआरमधून गायब, आरोग्य यंत्रणेतच ताळमेळ नाही

गर्भपातासाठी आलेली इस्लामूपरची महिला सीपीआरमधून गायब, आरोग्य यंत्रणेतच ताळमेळ नाही 


मूळची सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील गर्भपातासाठी आलेली महिला सीपीआरमधून गायब झाली आहे. त्या महिलेचा गर्भपात झाला का आणि ती सध्या आहे कुठे याचा ठावठिकाणी आरोग्य यंत्रणेला लागलेला नाही. हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाने त्या महिलेस सीपीआरला उपचारासाठी पोलिसांमार्फत पाठवले आहे. परंतु, सीपीआर प्रशासनाने मात्र या नावाची महिलाच सीपीआरला २२ एप्रिल २०२४ ला दाखल नव्हती असे सांगत हात वर केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल असून त्यावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे.

घडले ते असे : इस्लामपुरातील ही ३१ वर्षांची महिला (नाव लोकमतकडे उपलब्ध आहे) गर्भपातासाठी पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथील जननी सर्जिकल व मॅटर्निटी होममध्ये २२ एप्रिलला दाखल झाली. एका महिलेचा बेकायदेशीर गर्भपात सुरू असल्याचा फोन कुणीतरी ११२ क्रमांकावर केला. त्यावरून हुपरी पोलिसांना लगेच माहिती देण्यात आली. त्यांनी तिथे जाऊन हवालदार भांगरे (क्रमांक ८१६) यांनी खात्री केली असता ही महिला तिथे उपचारासाठी आल्याचे निदर्शनास आले.

खरी मेख..

पट्टणकोडोली येथील जननी सर्जिकल व मॅटर्निटी होम हे खासगी रुग्णालय राज्य शासनाच्या आरोग्य विभागात कोल्हापूर जिल्ह्यात सेवेत असलेल्या दोन डॉक्टरांचे असल्याचे समजते. तिथे शेजारच्या सांगली जिल्ह्यातील महिला गर्भपात करण्यासाठी कशी काय आली, मग तिथे गर्भपात केला जातो हे तिला कसे समजले असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

हातकणंगले रुग्णालय काय म्हणते..?

या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश जाधव यांना लोकमतने गुरुवारी विचारणा केली. ते म्हणाले, ही महिला पोलिसांसोबत ग्रामीण रुग्णालयात आली होती. रुग्णालयातील प्रसूती तज्ञांनी त्यांची हाताने तपासणी केली. तेव्हा त्यांच्या पोटात १४ ते १६ आठवड्यांचे अर्भक होते. त्याचे ठोकेही लागत होते. परंतु, या रुग्णालयात सोनोग्राफीची सोय नसल्याने आम्ही पोलिसांना पत्र देऊन पुढील उपचारासाठी मपोकॉ २३३५ साळोखे यांच्यासोबत सीपीआरला पाठवून दिले.

सीपीआर काय म्हणते,,,?

याबाबत सीपीआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी 'लोकमत'ने संपर्क साधला. ते म्हणाले, की या नावाची महिला सीपीआरमध्ये २२ एप्रिलला दाखल झाल्याची कोणतीही कागदोपत्री नोंद आढळत नाही. ती दाखल झाली नसल्याने त्या महिलेची सद्य:स्थिती सांगता येत नाही. परंतु, सीपीआरमधीलच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला २२ एप्रिलला रात्री ११:३० वाजता दाखल झाली आहे व लगेच १२:४० वाजता तिने स्वत:हून जबरदस्तीने डिस्चार्ज घेतल्याची नोंद उपलब्ध आहे. तिच्या पतीनेच त्यावेळी तिथे गोंधळ घातल्याची माहितीही पुढे येत आहे.

हुपरी पोलिसांचे पत्र

हुपरी पोलिस ठाण्याचे निरिक्षक एन.आर. चौखडे यांनी २२ एप्रिललाच (जावक क्रमांक १४८६) हातकणंगले रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, या महिलेची वैद्यकीय तपासणी होऊन ती गरोदर होती का, तिचा गर्भपात झाला आहे का..? या महिलेची बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी व गर्भपात झाला अथवा केला असल्यास त्याची प्राधिकृत अधिकारी नेमून चौकशी करावी व या कार्यालयास त्याबाबतीत माहिती कळवावी. पोलिसांनी हे पत्र पाठवून हे प्रकरण उजेडात आणले हे चांगले केले तरी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात त्या महिलेची जुजबी तपासणी झाली व तिला सीपीआरला पाठवले होते. त्यामुळे हेच पत्र त्यांनी सीपीआरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठवले असते तर त्यातून नेमकी वस्तुस्थिती बाहेर आली असती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.