विशाल पाटलांनी सांगलीत लढायची हिंमत दाखवली तर पाठिंबा देऊ; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी नागपूरच्या उमरेड येथे सभा झाली. यावेळी त्यांनी सांगली लोकसभेच्या जागेबाबत भाष्य केले. या सभेत त्यांनी म्हटले की, चार दिवसांपूर्वी प्रतीक पाटील माझ्याकडे आले होते, काय करायचं विचारत होते. मी त्यांना म्हणालो की, हिंमत असेल, तर लढा. तुम्ही लढलात तर आम्ही तुम्हाला पाठींबा देतो. आता त्यांच्यात हिंमत आहे की, नाही पाहायचे आहे. ते लढले, तर पाठिंबाही देऊ आणि निवडून आणू, अशी ग्वाही देतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अगोदरच मविआच्या चंद्रहार पाटील यांच्यासमोर भाजपच्या संजयकाका पाटील यांचे कडवे आव्हान आहे. संजयकाका पाटील यांच्या तुलनेत चंद्रहार पाटील हे राजकारणात नवखे आहेत. तसेच सांगली पट्ट्यात ठाकरे गटाची स्वत:ची अशी फारशी ताकद नाही. येथील बहुतांश आमदार काँग्रेस आणि शरद पवार गटाचे आहेत. अशात विशाल पाटील यांनी बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढल्यास चंद्रहार पाटील यांच्यासाठी सांगलीतून निवडून येणे अत्यंत अवघड असेल.
सांगलीत चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सभा; विश्वजीत कदम-सतेज पाटलांना निमंत्रण
शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार 15 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता सांगलीतील भावे नाट्य मंदिर येथे महाविकास आघाडीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ताकदीने उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यास जयंत पाटील, सतेज पाटील, विश्वजीत कदम यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना तसेच इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांना मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.