Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रचारावेळी भाजप उमेदवाराला गावाकऱ्यांनी विचारला जाब, सभा न घेताच परतले नेते

प्रचारावेळी भाजप उमेदवाराला गावाकऱ्यांनी विचारला जाब, सभा न घेताच परतले नेते 


लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर नेत्यांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. मोठमोठ्या रॅली, गावात मतदारांच्या भेटीगाठीना वेग आला आहे. नेत्यांकडून गावात जाऊन सभा घेतल्या जात आहेत. भंडारा-गोंदियातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रचार सभा न घेताच परतण्याची वेळ आली. गावकऱ्यांना त्यांना सभा न घेता परत पाठवलं. अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या बोळदे करड इथं हा प्रकार घडला.


भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे हे निवडणूक प्रचारासाठी रात्री 9 वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करड येथे गेले होते. मात्र येथील गावकऱ्यांनी त्यांना प्रचार सभा न घेताच परत घालवलं. गावकऱ्यांनी त्यांना वीज उपलब्ध नसल्याने प्रश्न विचारले. गावात १२ तास वीज पुरवठा का नाही? या प्रश्नावरून संताप व्यक्त केला. त्यामुळे सुनील मेंढे यांना प्रचारसभा न घेताच परत जाण्याची वेळ आली. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करड, झरपडा, ताडगाव, धाबेटेकडी आदर्श या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये विजेच्या कमी पुरवठ्यामुळे असंतोष आहे. तीन चार वर्षापूर्वी सिंचन व विजेच्या प्रश्नासाठी याच परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. कृषिपंपांना वीज मिळत नाही. शेतीला सिंचन होत नव्हते. रात्री बेरात्री शेतात जाऊन शेतात पिकांचे संरक्षण करणे देखील कठीण झाले, या मुद्द्यांवर परिसरातील शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये रोष आहे.

शुक्रवारी रात्री महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे, हे आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी मंत्री राजकुमार बडोले व पदाधिकाऱ्यांसह बोळदे करड येथे नियोजित प्रचारसभेसाठी गेले होते. सभेला सुरुवात करताच येथील गावकऱ्यांनी भाषणबाजी बंद करा आदी १२ तास विजेच्या प्रश्नावर बोला, सिंचनाचा प्रश्न केव्हा मार्गी लावणार, असे प्रश्न उपस्थित करीत रोष व्यक्त केला. सुनील मेंढे व पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण गावकरी ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. गावकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रचारसभा न घेताच उमेदवारांना परत जावे लागले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.