पोटच्या तरुण मुलीवर पैशांअभावी चांगले उपचार करता न आल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खचलेल्या पित्याने मुलीवर अंत्यसंस्कार केल्याच्या काही तासांत आत्महत्या करुन स्वतःचे जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली. निलंबनाच्या काळातील वेतन न मिळाल्यानेच हा प्रसंग ओढवल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह चार तास नगरपंचायत कार्यालयासमोर ठेवत मुख्याधिकार्यांवर कारवाईची मागणी केली. दीपक प्रल्हाद राऊत (वय ४५) असे आत्महत्या करणार्या व्यक्तीचे नाव असून ते नगरपंचायतचे कर्मचारी होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक राऊत यांच्या १९ वर्षीय मुलगी वैष्णवी हिचा रविवारी (दि.७) जळगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री घरातील सदस्य झोपी जाताच दीड ते दोनच्या दरम्यान गळफास घेत दीपक यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे सोयगावात एकच खळबळ उडाली. दीपक यांना फेब्रुवारीत निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांपासून त्यांना पगार नव्हते. मुलीला पोटाचा त्रास होऊ लागला.निलंबन काळातील अर्थे वेतन द्यावे यासाठी २६ मार्चला त्यांनी मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याकडे विनंती अर्ज केला होता. त्यानंतरही त्यांना वेतन मिळाले नाही. मुलीला पोटाचा त्रास वाढल्यामुळे २ एप्रिलला रात्री त्यांनी मुलीला जळगाव येथील सामान्य रुग्णालय येथे दाखल केले. ३ एप्रिलला ऑपरेशननंतर ती कोमात गेली. रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्याजवळ पैसे नव्हते म्हणून मुलगी गेली या भावनेतून त्यांनी आत्महत्या केली.
या घटनेने सोयगाव परिसरात एकच खळबळ उडाली. मुलीपाठोपाठ वडीलही गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संतप्त नातेवाईक व नागरिकांनी दीपक यांचा मृतदेह नगर पंचायतीच्या दारात आणून ठेवला. वेतन थांबवून आर्थिक अडचणीत आणणार्या मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व दीपकच्या पत्नीला नोकरी द्यावी, या मागणीसाठी आक्रोश करण्यात आला.
मुख्याधिकारी बबन तडवींवर गुन्हा दाखल करा
दोन्ही मृत्यूंना जबाबदार मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीची लेखी तक्रार करण्यात आली. तालुका प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार व्ही. टी. जाधव व पोलीस प्रशासनाकडून सहायक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी लेखी आश्वासन दिल्याने दुपारी तीन वाजता नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोन्ही घटनांची सोयगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.