Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेस आणि पवार गटाच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी :, संजय राऊत

काँग्रेस आणि पवार गटाच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी :, संजय राऊत 


सांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन रॅलीत सहभागी व्हावं अन्यथा सांगलीतील जनता तुम्हाला माफ करणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.

सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी ते बोलत होते. सांगलीतील जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. तिथं काँग्रेसचे विशाल पाटील लढण्यास इच्छुक आहेत. परंतु ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आणि ती उमेदवारी मागे घेण्यास ठामपणे नकार देत आहेत.

चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आलेले संजय राऊत म्हणाले की, सध्या सांगलीतील राजकीय वातावरण तापलं आहे. चंद्रहार पाटील प्रचारात पुढे पुढे जातील तसं इथल्या विरोधकांची डोकी तापतील. शिवसेना सांगलीत कशी हा प्रश्न भाजपासह काँग्रेसला पडलाय. परंतु हा प्रश्न जिल्ह्यातील १-२ लोकांना पडलाय, देश आणि राज्यातील नेत्यांना नाही. सांगली जिल्ह्यातील मक्तेदारी आमच्याकडेच राहावी. विशिष्ट घराण्याकडेच राहावी. ज्यांच्या हातात कारखाने, बँका, शैक्षणिक संस्था आपल्याच ताब्यात राहाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. सामान्य शेतकऱ्याच्या मुलानं विधानसभेत, संसदेत जाऊ नये. या जनतेनं आमचे गुलाम म्हणून राहायचं असं त्यांना वाटतं. सामान्यातला सामान्य माणूस आमदार, मंत्री, खासदार, जिल्हा परिषदेत गेला पाहिजे यासाठी ही लोकशाही आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच पश्चिम महाराष्ट्रात काहींना ही लोकशाही मान्य नाही. ५०-६० वर्षे आपली घराणी चालली पाहिजे. जोपर्यंत ती घराणी आहेत तोपर्यंत लोकशाही आहे. या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी आणि शिवसेनेनं केलं. शिवसेनेचा इतिहास पाहिला तर सामान्य माणूस, नोकरदार, मजुरी करणाऱ्याला शिवसेनेनं महापौर केला होता. वॉचमॅन, कर्मचारी असे आमदार झाले. मराठवाड्यात साखर कारखान्याच्या गेटवर तिकिट फाडणारे आमदार, मंत्री झाले. एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे. आमच्याकडे पैसे आहेत, बापजाद्यांकडे पैसे आहेत. त्यामुळे आमची पोरं खासदार, मंत्री झाले पाहिजे हे मक्तेदारी शिवसेनेनं मोडली असं सांगत संजय राऊतांनी पश्चिम महाराष्ट्रातील घराणेशाहीवर टीका केली.

दरम्यान, सांगलीत शेतकऱ्याचा मुलगा खासदारकीला उभा केला असेल, जो दोनदा महाराष्ट्र केसरी झाला, सांगलीतील शान वाढवली, क्रिडा क्षेत्रात मान वाढवला आहे. हा तरुण काहीतरी करू शकेल, आमचा आवाज उचलेल हा विश्वास वाटल्याने उद्धव ठाकरेंनी सांगली लढवण्याचं ठरवलं. चंद्रहार पाटील आल्यानंतर सांगली लोकसभा लढवायचीच हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केलंय, तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हा. नाहीतर लोक तुम्हाला सांगलीत माफ करणार नाहीत. चंद्रहार पाटील यांना मोठ्या संख्येने मेहनत करून मताधिक्य मिळवून द्यायला हवं. कवठे महाकांळ मतदारसंघातून प्रामाणिक नेतृत्व पुढे आले. अशा माणसाच्या मागे उभं राहून आपण बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना दिली पाहिजे असं संजय राऊतांनी म्हटलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.