Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! आईनेच मुलीला एक लाखात गोव्यात विकले

धक्कादायक! आईनेच मुलीला एक लाखात गोव्यात विकले

कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीपासून वेगळे राहणा-या महिलेने मित्राच्या मदतीने तिची एक वर्षाची मुलगी गोव्यातील दाम्पत्याला एक लाखात विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मुलीचे वडील दिलीप विलास ढेंगे (वय ३०, रा. इंगळी, ता. हातकणंगले) यांनी बुधवारी (दि. १७) पहाटे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. यातील महिलेसह तिचा मित्र आणि मुलगी विकण्यासाठी मध्यस्थी करणा-या संशयितास पोलिसांनी अटक केली.

मुलीची आई पूनम दिलीप ढेंगे (वय २५, मूळ रा. इंगळी, सध्या रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले), तिचा मित्र सचिन आण्णाप्पा कोंडेकर (वय ४०, रा. शहापूर, इचलकरंजी), मध्यस्थी करणारा किरण गणपती पाटील (वय ३०, रा. केर्ली, ता. करवीर) आणि गोव्यातील दाम्पत्य फातिमा फर्नांडिस व जेरी पॉल नो-होन्हा यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दिलीप आणि पूनम यांचे २०१८ मध्ये लग्न झाले. त्यांना तीन वर्षाचा एक मुलगा आणि एक वर्षाची मुलगी आहे. कौटुंबिक वादामुळे गेल्या वर्षभरापासून पूनम ही पट्टणकोडोली येथे तिच्या आईकडे राहते. १३ एप्रिल रोजी फिर्यादी दिलीप यांना त्यांच्या सासूचा फोन आला. पूनम हिने लहान मुलगी कोणालातरी दत्तक दिली असून, तुम्ही येऊन चौकशी करा, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार दिलीप यांनी पट्टणकोडोली येथे जाऊन चौकशी केली असता, सध्या पत्नी पूनम इचलकरंजीत सचिन कोंडेकर या मित्राकडे राहत असल्याचे समजले. तिथे जाऊन चौकशी केली असता, तिने मुलीला आष्टा (जि. सांगली) येथील पाळणाघरात ठेवल्याचे सांगितले. तिला आत्ताच्याआत्ता भेटायचे असल्याचा आग्रह धरल्यामुळे अखेर तिने मुलीला गोव्यातील दाम्पत्याकडे विकल्याचे सांगितले. ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केल्याचेही तिने दाखवले.

हुपरी पोलिसांनी लक्ष्मीपुरीत पाठवले

मुलीची विक्री झाल्याचा प्रकार लक्षात येताच दिलीप याने हुपरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत करवीर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात नोटरी झाल्याने पोलिसांनी ढेंगे यांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. ढेंगे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून तातडीने तिघांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पाटील अधिक तपास करीत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.