Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऑपेरेशन ' ससून '! अधिष्ठात्यांना डावलून थेट आयक्तांनी हाती घेतली सूत्रे

ऑपेरेशन ' ससून '! अधिष्ठात्यांना डावलून थेट आयक्तांनी हाती घेतली सूत्रे 


ससून सर्वोपचार रुग्णालयात वर्षभरात पाचवा वैद्यकीय अधीक्षक नेमण्याची वेळ आली आहे. विद्यमान अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना तडकाफडकी या पदावरून दूर करण्यात आले आहे. सुमारे वर्षभरापूर्वी याच पदावरून हटविलेल्या डॉ. यल्लाप्पा जाधव यांच्याकडे पुन्हा पदभार देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ससूनमध्ये मागील काही काळात घडलेल्या गैरप्रकारांमुळे अधिष्ठात्यांना डावलत थेट वैद्यकीय आयुक्तांनी नियुक्तीचा हा आदेश काढला आहे.


गेल्या वर्षी मे महिन्यात डॉ. यल्लाप्पा जाधव यांची ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर तीन महिन्यांनी ऑगस्टमध्ये त्यांना हटवून डॉ. सुनील भामरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर डॉ. भामरे यांच्या जागी महिनाभरात सप्टेंबरमध्ये डॉ. किरणकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. या तिन्ही नियुक्त्या तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी केल्या होत्या. याबाबतचे आदेशही त्यांनी काढले होते. नंतर डॉ. ठाकूर यांना ललित पाटील प्रकरणात पदमुक्त करण्यात आल्यानंतर डॉ. विनायक काळे यांच्याकडे अधिष्ठातापद सोपविण्यात आले.

डॉ. काळे यांनी नोव्हेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरातच डिसेंबरमध्ये त्यांनी अधीक्षक बदलण्याचे पाऊल उचलले. त्यांनी डॉ. किरणुकमार जाधव यांना हटवून त्यांच्या जागी डॉ. अजय तावरे यांची नियुक्ती केली. याबाबतचा आदेश डॉ. काळे यांनी काढला होता. आता मात्र थेट वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. राजीव निवतकर यांनी डॉ. यल्लापा जाधव यांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे. त्यामुळे अधिष्ठात्यांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनेक वरिष्ठांवर कारवाईची टांगती तलवार

ससून रुग्णालयात मागील काही काळात घडलेल्या गैरप्रकारांची गंभीर दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्तांनी अधिष्ठात्यांना नवीन वैद्यकीय अधीक्षकाची नियुक्ती करण्यास न सांगता थेट नियुक्तीचे आदेश काढला आहे. ससूनमधील अनेक चौकशा प्रलंबित असून, याप्रकरणी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारसही वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून राज्य सरकारला करण्यात आली आहे. यामुळे ससूनमधील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापुढील काळात रुग्णालयाचे प्रशासन सुधारण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. याचबरोबर रुग्णसेवा आणखी सक्षम करण्याचे प्रयत्न केले जातील.

डॉ. यलाप्पा जाधव, अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय
ससूनच्या अधीक्षकपदाचा फेरा

मे ते ऑगस्ट २०२३ – डॉ. यलाप्पा जाधव
ऑगस्ट ते सप्टेंबर २०२३ – डॉ. सुनील भामरे
सप्टेंबर ते डिसेंबर २०२३ – डॉ. किरणकुमार जाधव
डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ – डॉ. अजय तावरे
एप्रिल २०२४ – डॉ. यल्लाप्पा जाधव

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.