बंगळूर : मुलानेच आपले वडील आणि सावत्र आईला मारण्याची सुपारी दिली होती. त्यातूनच चौघांचे हत्याकांड घडले, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, याप्रकरणी सूत्रधारासह आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. हे आठ संशयित मिरजेचे रहिवासी आहेत. त्यांना 65 लाखांची सुपारी देण्यात आली होती, असेही तपासात निष्पन्न झाले आहे.
विनायक बाकळे नावाचा युवक या हत्याकांडातील प्रमुख संशयित आहे. त्याने आपले वडील प्रकाश बाकळे आणि सावत्र आई सुनंदा यांना मारण्याची सुपारी दिली होती; पण बळी गेला तो बाकळे यांच्या पाहुणे असलेल्या दाम्पत्याचा तसेच त्यांच्या मुलीचा. त्यासह विनायकचा सावत्र भाऊही या हत्याकांडात मारला गेला. फिरोज निसारअहमद काझी (वय 29, रा. राजीव गांधीनगर, गदग), झिशान मेहबूबअली काझी (24, हुडको) यांच्यासह मिरज येथील साहील अश्पाक काझी (19), सोहेल अश्पाक काझी (19), सुलतान जिलानी काझी (23), महेश जगन्नाथ साळोंके (21), वाहिद लियाकत बेपारी (21) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गदगचे रहिवाशी प्रकाश बाकळे आणि त्यांचा मुलगा विनायक यांच्यात मालमत्तेवरुन वाद होता. विनायक हा प्रकाश यांचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा. विनायकच्या आईच्या मृत्यूनंतर प्रकाश यांनी दुसरे लग्न केले होते. त्यानंतर मुलगा आणि वडील यांच्या मालमत्तेवरून वाद निर्माण झाला होता. विनायकने वडिलांना काहीच न कळवता मालमत्ता विकली होती. यावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. त्यानंतर विनायकने आई-वडिलांना मारण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने संशयितांना सुपारी दिली.
सुदैवानेच बाकळे दांपत्य वाचले
प्रकाश बाकळे आणि त्यांची पत्नी सुनंदा घरातील वरच्या खोलीत झोपी गेले होते. त्यांनी दरवाजाची आतील कडी लावून घेतली होती. संशयितांनी दरवाजावर अनेकदा लाथा मारल्या. तोपर्यंत प्रकाश यांनी पोलिसांशी संपर्क साधला. यामुळे घाबरुन संशयितांनी तेथून पलायन केले. पण, त्याआधी त्यांनी त्यांचा दुसरा मुलगा कार्तिक याच्यासह वाग्दत्त वधू व तिच्या आई-वडिलांची हत्या केली. या प्रकरणाने गदगसह संपूर्ण राज्य हादरले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.