6 पोती भरून पैसे आणले, रेल्वेत 4 कोटीच्या कॅशसह भाजपचे कार्यकर्ते रंगेहात सापडले :, भाजपच्या उमेदवाराची कॅश
एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे असताना सत्ताधारी भाजपचे कार्यकर्तेच कोटय़वधी रुपयांची अफरातफर करीत असल्याचे समोर आले आहे. चेन्नईच्या तांबरम रेल्वे स्थानकावर भाजपच्या कार्यकर्त्यांना तब्बल चार कोटींच्या रकमेसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शनिवारी रात्री उशिरा नेल्लई एक्प्रेसमधून 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेऊन निघालेल्या तिघांना पकडण्यात आले. देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचली असून प्रचाराचा धुरळा उडत आहे. अशा वेळी आचारसंहितेच्या अंमलबजावणीकडेही निवडणूक आयोगाचे कडक लक्ष आहे. मात्र भाजपकडून आचारसंहितेच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे.
अशात ही घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यासह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. हे लोक चार कोटी रुपये सहा पोत्यात घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होते आणि हा पैसा लोकसभा निवडणुकीत वापरायचा होता. चेंगलपट्टू जिल्हा निवडणूक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार जप्त केलेली रोकड पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठवण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांमध्ये भाजप नेते आणि खासगी हॉटेलचा व्यवस्थापक सतीश, त्याचा भाऊ नवीन आणि चालक पेरुमल यांचा समावेश आहे. दरम्यान, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तामीळनाडूच्या 39 मतदारसंघांमध्ये 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.
दक्षिणेत सत्ता मिळवण्यासाठीच धडपड
दक्षिणेतील एकाही राज्यात भाजपची सत्ता नाही. तामीळनाडूमध्ये काँग्रेस द्रमुकसोबत सरकारमध्ये आहे, तर तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारमध्ये आहे. तामीळनाडूमध्ये लोकसभेच्या एकूण 39 जागा आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला दक्षिण हिंदुस्थानात आपली कामगिरी सुधारायची आहे. त्यामुळेच भाजपकडून पैशाचा वापर होत असल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या उमेदवाराची कॅश?
आदर्श आचारसंहितेनुसार 10 लाखांच्या वरील रकमेची चौकशी करावी लागते, असे चेंगलपट्टूच्या निवडणूक आयुक्तांनी सांगितले. जप्तीशी संबंधित सर्व माहिती प्राप्तिकर विभागाला पाठवण्यात आल्याचेही ते म्हणाले. सतीशने तिरुनेलवेली येथील भाजपचे लोकसभा उमेदवार नयिनर नागेंद्रन यांच्या टीमच्या सूचनेनुसार काम केल्याची कबुलीही दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.