स्वत: संचालकानेच वसतिगृहातील एका मुलीला सलग ५० पेक्षा अधिक कॉल, मेसेज केले. आरडाओरड करत दरवाजा उघडण्यासाठी धिंगाणा घातला. रेल्वे स्टेशन रोडवरील रचनाकार कॉलनीत मातोश्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये रविवारी मध्यरात्री २ वाजता ही धक्कादायक घटना घडली.
मुलीचे भाऊ आल्याचे कळताच त्याने दरवाजा लावून घेत त्यांनाही येण्यास मज्जाव केला. स्थानिकांच्या कॉलनंतर पोलिसांनी धाव घेतल्यानंतर त्याने दरवाजा उघडला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत ठाण्यात नेले. मात्र, काही वेळातच तो पुन्हा वसतिगृहात परतल्याने मुली मात्र पुरत्या घाबरून गेल्या होत्या.
जून महिन्यात अनिल खटाळ याने सोसायटीमधील अग्रवाल यांच्याकडून ही इमारत वसतिगृहासाठी भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतली होती. ७० मुली तेथे राहतात. वसतिगृहामधील मुलींनी केलेल्या आरोपानुसार, त्यांच्यासोबत राहणारी शिर्डी येथील १९ वर्षीय युवती तळमजल्यावरील खोलीत झोपली होती. रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास खटाळने अचानक तिच्या खोलीचा लाकडी भाग वाजवण्यास सुरुवात केली. दरवाजा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येत असल्याने त्याने बाथरुमजवळील बोळीतून हा प्रकार सुरू केला. ती दरवाजा उघडत नसल्याने त्याने ५० पेक्षा अधिक कॉल, मेसेज करत धिंगाणा घातला. मुलीने घाबरून शहरातील चुलत भावांना फोनवर हा प्रकार कळवला. तिच्या भावांनी तत्काळ धाव घेतली. मात्र, घाबरून खटाळने वसतिगृहाचा दरवाजा बंद केला. भावांनी आरडाओरड करत दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, खटाळने उघडला नाही.हा धिंगाणा ऐकून जवळच राहणारे भाजप पदाधिकारी सुभाष पाटील, त्यांची मुले किशोर व संदीप यांना जाग आली. त्यांनी तत्काळ ११२ वर संपर्क साधला. पोलिसांनी धाव घेत सुनावल्यानंतर खटाळने दरवाजा उघडला. त्याला ठाण्यात नेताच मुलीचे भाऊदेखील ठाण्यात गेले. मात्र, काही वेळातच कदम नामक अधिकाऱ्याने त्याला ठाण्यातून पुन्हा वसतिगृहावर आणून सोडले. त्यानंतर खटाळ बाहेरच्या बाहेरच मोबाइल बंद करून पसार झाला. सोमवारी रात्रीपर्यंत त्याचा मोबाइल बंद होता.
सोमवारी दुपारपर्यंत मुली दहशतीत होत्या. मुलींनी दामिनी पथकाशी संपर्क साधल्यानंतर उपनिरीक्षक कांचन मिरधे यांनी येऊन धीर दिला. मात्र, मुलींनी तक्रार देण्यास नकार दिला. सायंकाळपर्यंत सर्वच मुलींच्या पालकांनी येऊन वसतिगृह सोडण्याचा निर्णय घेतला. मुलींनी सुरुवातीला ८० हजार ते १ लाख रुपये खटाळकडे जमा केले होते. मिरधे यांनी खटाळच्या पत्नीला बोलावले. ती सायंकाळी आली. वेदांतनगरच्या निरीक्षक प्रवीणा यादव, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे हे देखील आले. पाटील, स्वाभिमानी मराठवाडा युवक प्रतिष्ठानचे गौतम आमराव यांनी ठाण्यात मुलींचे सर्व पैसे परत देण्याची मागणी केली. खटाळच्या पत्नीने पैसे परत करण्याची तयारी दाखवली
वसतिगृहामध्ये वास्तव्य कसे ?
खटाळ मुलींच्याच वसतिगृहामध्येच खोलीत राहत होता, असे मुलींनी सांगितले. मुलींच्या कुटुंबाला आत प्रवेश नव्हता. मग खटाळ एकटाच कसा राहत होता, असा गंभीर प्रश्न आहे. खटाळ पसार आहे. त्याचा शोध घेऊन चौकशी केली जाईल, असे निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.