बुलढाणा : शुक्रवारी लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आलेल्या सिंदखेडराजा येथील तहसिलदार सचिन शंकरलाल जैस्वाल यांचा बंगला व निवासस्थानी तब्बल ४६ लाखांची रोकड सापडल्याचे खळबळजनक वृत्त आहे. तहसीलदार जैस्वाल, शिपाई पंजाब ताठे, चालक मंगेश कुलथे यांना ५ हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. यानंतर लाचलुचपत विभागाने वेगाने कारवाईची सूत्रे हलविली.
बुलढाणा येथील कर्मचाऱ्यांच्या पथकाने जैस्वाल यांच्या सिंदखेडराजा येथील शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतली. तिथे नोटांचे ढीगच हाती लागले. त्याठिकाणी तब्बल ३७ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम आढळून आली. त्यांच्या परभणी येथील घराची परभणी एसीबीने झडती घेतली असता तिथे ९ लाख ४० हजाराची रक्कम आढळून आली. पुढील तपासात आणखी मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी बोलून दाखविली.यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून अवैधरित्या वाळू वाहतुक करण्यासाठी त्यांना ३५ हजाराची लाच मागण्यात आली होती. त्यांनी तक्रार केल्यावर विभागाने कारवाई केली. यानंतर मात्र मोठेच घबाड हाती लागले. सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याच्याकडील इतर मालमत्तांचा शोध सुरू असून सिंदखेडराजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.