कुटुंबाचा अर्थ होतो एकमेकांसोबत राहणं. एकमेकांना साथ देणं. एकमेकांच्या सुख-दु:खात सामील होणं. पण आज काल विभक्त कुटुंब पद्धती पाहायला मिळत आहे. लग्न झाल्याबरोबर प्रत्येकाला प्रायव्हसीच्या नावाखाली वेगळा संसार थाटायचा असतो.
कुटुंबाचा विचार करण्याऐवजी स्वत:चा विचार करत असतात. अनेकदा तर मुलांनी आई वडिलांना घरातून बाहेर काढल्याच्या गोष्टीही कानावर येत असतात. अशावेळी मग आई वडिलांनीही आपली संपत्ती इतरांच्या नावावर केली किंवा कुणाला तरी दान केली तर आश्चर्य वाटायला नको. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.इटलीच्या एका महिलेने आपली कोट्यवधीची संपत्ती तिच्या केअरटेकरच्या नावावर केली आहे. जेव्हा तिच्या नातेवाईकांना ही माहिती मिळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला. ही महिला असं काही करेल अशी त्यांना कल्पनाच नव्हती. या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीचे आपणच उत्तराधिकारी होऊ असं या नातेवाईकांना वाटत होतं. पण झालं भलतंच. एका संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, महिलेचा कोणीही प्रत्यक्ष उत्तराधिकारी नव्हता. त्यामुळे तिने तिची 5.4 मिलियन डॉलर म्हणजे 45 कोटीची संपत्ती तिच्या केअरटेकरच्या नावावर केली. हा केअरटेकर अल्बानिया येथे राहतो.
80 व्या वर्षी मृत्यू
इटली येथे राहणारी ही महिला ट्रेंटो प्रांताच्या एका गावातील रोवरेटो येथील प्रसिद्ध घराण्यातील होती. मारिया मालफट्टी असं या महिलेचं नाव होतं. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये वयाच्या 80 व्या वर्षी या महिलेचा मृत्यू झाला. रोवरेटोचे माजी महापौर आणि व्हियनाच्या संसदेचे उपाध्यक्ष वेलेरियानो मालफट्टीची वंशज मारियाकडे प्रचंड संपत्ती होती. त्यात अपार्टमेंट, शहराच्या मध्यवर्ती भागात ऐतिहासिक इमारत आणि बँकेतील कोट्यवधीचा समावेश आहे.
भाच्यांना बेदखल केलं
या महिलेने लग्न केलेलं नव्हतं. त्यामुळे तिच्या संपत्तीचा कोणी प्रत्यक्ष वारस नव्हता. पण तिला अनेक भाचे होते. मारियाची संपत्ती आपल्याला मिळेल असं तिच्या भाच्यांना वाटत होतं. पण गेल्या काही वर्षापासून देखभाल करणाऱ्या केअरटेकरलाच मारियाने आपली सर्व संपत्ती देऊन टाकली.
फसवणुकीचा आरोप
मारियाने तिची सर्व संपत्ती केअरटेकरच्या नावावर केल्याचं जेव्हा तिच्या भाच्यांना कळलं तेव्हा त्यांनी एका वकिलाशी संपर्क साधला. तसेच मारियाची संपत्ती जप्त केल्याचा तिला फसवल्याचा दावा केअरटेकर विरोधात केला. वय जास्त झाल्याने मारियाची विचारशक्ती क्षीण झाली होती. त्याचा केअरटेकरने फायदा उचलला. त्याने सर्व संपत्ती आपल्या नावे केली, असा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.