महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीचे दिग्गज नेते आवर्जून उपस्थित होते. या वेळेस झालेल्या सभांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
महाविकास आघाडीच्या झालेल्या सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी सांगत आहेत की, देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची झाली आहे, याचा मला अभिमान आहे. परंतु, आताच्या घडीला मनमोहन सिंग पंतप्रधान असते तर भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची झाली असती. यासंदर्भात काही रिपोर्टही आले आहेत, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी सडकून टीका केली.
भाजपाच्या जाहीरनाम्यात मोदींचे ४२ फोटो
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजपाच्या जाहीरनामावर मोदींचे ४२ फोटो आहेत. अनेक ठिकाणी मोदी आपला फोटो वापरत आहेत. मोदींना भीती आहे की, आपला फोटो नसला तर लोक आपल्याला विसरतील, असा खोचक टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.दरम्यान, गेली १० वर्षे सत्ता असणाऱ्या सत्ताधारी लोकांनी फसवले आहे. २०१४ मध्ये मोदी सत्तेत आले, त्यावेळेस पेट्रोल ७१ रुपये लीटर होते. आज पेट्रोल १०५ रुपये आहेत. सत्तेचा उन्माद काय असतो, ही बाब सत्ताधारी लोकांनी दाखवून दिली. लोकशाही वाचविण्यासाठी तयार राहा, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.