क्रिकेटविश्वाला धक्का देणारी बातमी सोमवारी (15 एप्रिल) समोर आली. इंग्लंडचे महान फिरकीपटू डेरेक अंडरवूड यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. याबद्दल त्यांचा काउंटी संघ केंटने माहिती दिली आहे. साल 1963 ते 1987 दरम्यान प्रोफेशनल क्रिकेट खेळलेल्या अंडरवूड यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 3000 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
अंडरवूड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून 1966 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 86 कसोटी सामने खेळताना 297 विकेट्स घेतल्या. तसेच त्यांनी 26 वनडे सामनेही खेळले, ज्यात त्यांनी 32 विकेट्स घेतल्या. अंडरवूड 1975 सालच्या वर्ल्डकपमध्येही इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते.त्यांची अविस्मरणीय कामगिरी 1968 सालच्या ऍशेस मालिकेतील द ओव्हल मैदानावर झालेल्या कसोटीत झाली. त्यांनी 27 चेंडूत 4 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यावेळी सामना संपायला अवघे 6 मिनिटे राहिलेले असताना इंग्लंडने तो सामना जिंकला होता, त्यामुळे मालिका बरोबरीवर संपली होती.
इंग्लंडचे सर्वात यशस्वी फिरकीपटू
दरम्यान अंडरवूड इंग्लंडचे सर्वात यशस्वी फिरकीपटू आहेत. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या एकूण गोलंदाजांच्या यादीत ते 6 व्या क्रमांकावर आहे, तर फिरकीपटूंमध्ये अव्वल क्रमांकावर आहेत. सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांमध्ये त्यांच्यापाठोपाठ ग्रॅमी स्वान आहे. त्याने 255 विकेट्स घेतल्या आहेत.
केंटचे प्रमुख खेळाडू
अंडरवूड यांनी वयाच्या 17 व्या वर्षीच केंट संघासाठी पदार्पण केले होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण प्रथम श्रेणी क्रिकेट इंग्लंड व्यतिरिक्त केंट संघासाठी खेळले. त्यांनी केंटकडून 900 हून अधिक सामने खेळताना 2500 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या. त्यांचे केंटसाठी 19 च्या जवळपास गोलंदाजी सरासरी होती. त्यांना डेडली या टोपन नावानेही त्यांचे संघसहकारी बोलवायचे, कारण डावखुरे फिरकीपटू असलेल्या अंडरवूड यांच्या गोलंदाजीत कमालीची अचूकता आणि वेगही होता. ते पावसानंतरच्या खेळपट्टीवर अधिक घातक ठरायचे.त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 676 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 2465 विकेट्स घेतल्या, तसेच 5165 धावाही केल्या, ज्यात एका शतकाचा समावेश आहे. त्याचबरोबर 411 लिस्ट ए क्रिकेट सामने खेळले असून 572 विकेट्स घेतल्या. तसेच 815 धावा केल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.