" फक्त 300 मिळाले?नवनीत राणा यांच्या सभेसाठी महिलांना वाटले पैसे?, रवी राणा म्हणाले, " हो पैसे वाटले ",
निवडणूक म्हटली की जंगी जाहीर सभा घ्याव्या लागतात. या सभांना स्टार प्रचारक किंवा पक्षाचे नेते संबोधित करतात. निवडणूक काळात वातावरण निर्मितीसाठी जाहीर सभा घेण्याचा ट्रेंड दिसतो. मात्र हल्ली जाहीर सभांना गर्दी जमवणे हे पुढाऱ्यांसाठी मोठे डोकेदुखीचे काम ठरते.
त्यातही कडक उन्हाळ्यात सभेसाठी लोक आणणे हे आव्हानच आहे. अशातच आता अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ दि. २४ एप्रिल रोजी झालेल्या सभेत पैसे देऊन लोकांना आणले गेले होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात काही महिला सभेतून घरी जाताना दिसतात. या महिलांना एक व्यक्ती येऊन पैसे मिळाले का? अशी विचारणा करतो. महिलांनी हो म्हटल्यानंतर तुम्हाला कमी पैसे मिळाल्याचे सांगून सदर व्यक्ती या महिलांकडून सर्व माहिती काढून घेत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओचा आधार घेऊन रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला.
'सगळीकडे कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप… यांना सभेला पैसे देऊन रोजाने माणसं आणावे लागतात हे आता जगजाहीर आहे, पण या गरीब माणसांच्या पैशातूनही हे कसं कमिशन खातात ते या व्हिडिओत बघा.. आता एकच मिशन.. ज्यांनी खाल्ली दलाली. त्यांना पाठवू घरी!!!', अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली.
हो आम्ही पैसे वाटले, पण ते…
दरम्यान रोहित पवार यांच्या पोस्टनंतर नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी यावर प्रत्युत्तर दिले. 'रोहित पवार यांना अमरावतीचा अभ्यास नाहीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेसाठी लाखो महिला आल्या होत्या. या लाखो महिलांना पाणी वाटण्यासाठी आम्ही १०० ते १५० महिलांना काम दिले होते. जेणेकरून सभेला उपस्थित महिलांना जागेवरून उठावे लागणार नाही. पाणी पाजण्यासाठी त्यांना मानधन देण्यात आले होते. त्यासाठी ते पैसे वाटण्यात आले. तोच व्हिडिओ वारंवार दाखवला जात आहे. आता लाखोंच्या संख्येने एवढ्या कडक उन्हाळ्यात सभेला आलेल्या लोकांना पाणीही द्यायचे नाही का?', असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला.रोहित पवार यांनी अमरावती येऊन पाहावे. याठिकाणी लाखोंच्या संख्येने महिला नवनीत राणा यांच्या पाठिशी उभ्या आहेत, हे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे. आज सायंकाळी सहा वाजता मतदान संपत आहेत. निश्चितच नवनीत राणा लाखोंच्या मताधिक्याने याठिकाणी निवडून येणार, असा मला विश्वास असल्याचेही ते म्हणाले. रवी राणा पुढे म्हणाले, या व्हिडिओत विचारणारा माणूस बोगस आहे. त्या महिलांना तो दबाव टाकून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. लाखोंच्या संख्येने लोक सभेसाठी आल्यानंतर त्यांच्यासाठी पाणी, नाश्ता, औषधे, रुग्णवाहिका अशा सुविधा पुरवाव्या लागतात. त्यासाठी वेतन देऊन माणसे नेमावी लागतात. हे सर्वच सभेत होत असते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.