मुंबई : इतर क्षेत्रांप्रमाणे कॉस्मेटिक आणि ब्युटी इंडस्ट्रीमध्येदेखील आमूलाग्र प्रगती झाली आहे. आजकाल म्हातारपण लपवण्यासाठी ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एवढंच नव्हे, तर विविध प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरीही केल्या जातात. चेहरा तरुण ठेवण्यासाठी इंजेक्शनचा वापर केला जात असून, त्याला 'व्हॅम्पायर फेशिअल' म्हणतात. न्यू मेक्सिकोमधल्या स्पामध्ये हे फेशिअल केल्यानंतर तीन महिलांना एचआयव्हीची लागण झाली आहे.
'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, फेशिअलची ही पद्धत खूपच विचित्र आहे. अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज अँड कंट्रोलने (सीडीसी) याबाबत माहिती दिली आहे. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, न्यू मेक्सिकोमधील स्पामध्ये व्हॅम्पायर फेशिअल ट्रीटमेंट घेतल्यानंतर तीन महिलांना एचआयव्हीची लागण झाली आहे. हे व्हॅम्पायर फेशिअल म्हणजे नेमका काय प्रकार आहे, त्यामुळे व्यक्ती एचआयव्ही संसर्गाला कशी बळी पडते, याबाबत माहिती घेऊ या.
व्हॅम्पायर फेशिअल प्रक्रियेमध्ये हातातून रक्त काढून चेहऱ्यावर इंजेक्ट केलं जातं. याला प्लेटलेट-रिच प्लाझ्मा मायक्रोनीडलिंग प्रोसेस म्हणतात. सामान्यतः ही प्रक्रिया फेशिअल म्हणून ओळखली जाते. या प्रकरणातल्या पीडित महिलांनी 2018 मेक्सिकोमधल्या विनापरवाना स्पामध्ये व्हॅम्पायर फेशिअल केलं होतं. त्यानंतर या महिलांची तपासणी केली असता त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. फेशिअलदरम्यान वापरल्या गेलेल्या कॉस्मेटिक इंजेक्शनमुळे त्या एचआयव्हीला बळी पडल्याचा आरोप होत आहे. राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयातले सिनिअर रेसिडेंट डॉ. अंकित कुमार म्हणतात, की एचआयव्ही बाधित व्यक्तीचं रक्त दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या शरीरात गेल्यास तिलाही एचआयव्ही होऊ शकतो.अमेरिकन सीडीसीने सर्व प्रकारे तपास केला आहे. या तपासात असं आढळलं, की या महिलांनी इंजेक्शनद्वारे औषधं घेतलेली नाहीत, त्यांना संसर्गग्रस्त रक्तही दिलं गेलेलं नाही किंवा एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीशी त्यांचे शारीरिक संबंधही नव्हते. कॉस्मेटिक इंजेक्शनमुळेच त्यांना हा संसर्ग झाला आहे. 2019मध्ये परवान्याशिवाय चालणाऱ्या स्पाकडे दुर्लक्ष झाल्याचा मुद्दाही पुढे आला होता. न्यू मेक्सिकोच्या आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईनंतर हा स्पा बंद करण्यात आला. त्या ठिकाणी व्हॅम्पायर फेशिअल केलेल्यांच्या मोफत विविध चाचण्या केल्या जातील, असेही निर्देश देण्यात आले. त्याअंतर्गत स्पाचे ग्राहक असलेल्या सुमारे 200 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी कोणालाही संसर्ग झाल्याचं आढळलं नाही.
ऑनलाइन वृत्तांनुसार, या व्हॅम्पायर फेशिअलच्या संपूर्ण प्रक्रियेला 40 ते 50 मिनिटं लागतात. जर एखाद्याच्या चेहऱ्यावर डाग किंवा इतर व्रण असतील तर ते दूर करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. हातातून काढलेलं रक्त इंजेक्शनच्या मदतीने त्याच व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये इंजेक्ट केलं जातं. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की व्हॅम्पायर फेशिअलसारख्या पद्धतींमुळे प्लेटलेट्स त्वचेच्या नवीन पेशी आणि कोलॅजनच्या वाढीस चालना देतात. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.