Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

2900 कोटींची संपत्ती असूनही, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या 1 BHK मध्ये का राहतो सलमान

2900 कोटींची संपत्ती असूनही, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या 1 BHK मध्ये का राहतो सलमान 


सध्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट चांगलंच चर्चेत आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान  राहतो. समुद्र किनाऱ्यासमोर असणाऱ्या या अपार्टमेंटच्या गॅलरीतून सलमान खान आपल्या चाहत्यांना भेटत असतो.


रविवारी, पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास या गॅलरीच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्याने खळबळ उडाली. बॉलिवूडमध्ये ज्याच्या शब्दाचा मान, आदरयुक्त भीती आहे, ज्याची संपत्ती जवळपास 2900 कोटींच्या घरात आहे, तो सलमान खान वांद्रे येथील वन बीएचके फ्लॅटमध्ये का राहतो असा अनेकांना प्रश्न पडला असेल. त्याचे कारणही सलमानने एकदा सांगितले होते.

ज्यावेळी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या, त्यावेळी सलमान खान घरीच होता. या घटनेत तो सुखरुप आहे. सलमान खान राहत असलेला गॅलेक्सी अपार्टमेंट हा इतर फिल्म स्टार्सच्या घरांसारखं किंवा बंगल्यासारखे आलिशान नाही. सलमानची इच्छा असेल तर तो कुठेतरी जाऊन राहू शकतो आणि स्वतःचे सुंदर घर बांधू शकतो. पण त्याने तसे केले नाही. 

गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये का राहतो सलमान?

सलमान खानने एका कार्यक्रमात आपण गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये का राहतो, याचे उत्तर दिले होते. आपल्या आई-वडिलांसाठी त्या इमारतीमध्ये राहत असल्याचे सलमानने सांगितले. 2009 मध्ये 'तेरे मेरे बीच में' या फराह खानच्या शोमध्ये सलमानने आपल्या घराबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी त्याला विचारले होते की, तू सुपरस्टार आहेस, कोट्यवधी कमावतोस पण एक बेडरुम हॉलच्या रुममध्ये का राहतो? त्यावेळी सलमानने सांगितले की, खरंतर माझं घर हे तीन बेडरुम किचन आहे. पण, तो वन बीएचके कसा झाला माहित नाही. मी आईसाठी त्याच इमारतीत राहत असल्याचे सलमानने सांगितले. सलमान खान हा गॅलेक्सी अपार्टमेंटच्या तळमजल्यावर राहतो. तर, आई-वडील पहिल्या मजल्यावर राहतात. 

आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो सलमान 

फराहने पुढे विचारले की, आपण आईच्या जवळ आहोत, हा विचार करून किती सुरक्षित असल्याचे वाटते. त्यावर त्याने सांगितले की, आम्ही ज्यावेळी पहिल्या मजल्यावरील त्यांच्या घरी जातो, तेव्हा आई-वडिलांच्या शेजारी जाऊन झोपतो. 

शोच्या या भागात सलमानने आपल्या घराबाहेर जमणाऱ्या चाहत्यांबाबतचा एक किस्सा सांगितला होता. त्याने सांगितले की, पोलीस अधिकारी सांगायचे की, सलमान तू आपल्या चाहत्यांना काही मिनिटांसाठी का असेना पण भेट. त्यांना तुझी एक झलक तरी दाखव. यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. एकदा तुला पाहिले की चाहते निघून जातील. 

यंदा, 11 एप्रिल रोजी ईदच्या दिवशी सलमान खान हा कुटुंबीयांसह गॅलरीत चाहत्यांच्या भेटीसाठी आला होता. यावेळी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाईलाजाने लाठीचार्ज करावा लागला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.