'डायमंड हाऊस'मध्ये राहतोय शेतकऱ्याचा लेक; संपत्ती तब्बल 19000 कोटी
हैदराबाद : आजवर तुम्ही बरेच श्रीमंत पाहिले असतील, त्यांची नावं आणि त्यांच्याबाबत ऐकलं असेल. अशीच एक श्रीमंत व्यक्ती सध्या चर्चेत आली आहे, ही व्यक्ती म्हणजे एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक शेतकऱ्याचा मुलगा चक्क डायमंड हाऊसमध्ये राहतो आहे. त्याची संपत्ती इतकी की आकडा पाहूनच तुम्हाला चक्कर येईल. तब्बल 19000 कोटी रुपयांच्या संपत्तीचा तो मालक आहे.
मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिडेट कंपनीचा मालक पामिरेड्डी पिची रेड्डी. रेड्डी हे शेतकरी कुटुंबातून आले आहेत. कृष्णा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे ते पाचवं अपत्य आहे. पण त्यांची गणना देशातील अब्जाधीश उद्योगपतींमध्ये केली जाते. इलेक्टोरल बाँड्स खरेदीच्या बाबतीत त्यांची कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची कंपनी अलीकडेच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. देशातील अनेक मोठ्या पक्षांना त्यांनी निवडणूक देणग्या दिल्या आहेत, मात्र शनिवारी सीबीआयने याविरोधात लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
एका शेडपासून सुरू झालेला प्रवास
पीपी रेड्डी यांनी हैदराबादच्या बालानगर येथील एका शेडमधून मेघा इंजिनिअरिंग एंटरप्रायझेस नावाची कंपनी सुरू केली. फक्त 5 लाख रुपयांचं भांडवल आणि नगरपालिकांसाठी पाईप्स तयार केले. त्यांचा पुतण्या, पीव्ही कृष्णा रेड्डी 2 वर्षांनंतर कंपनीत रुजू झाला आणि दोघंही हळूहळू रस्ते आणि लहान पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये रुजू झाले. 2006 मध्ये कंपनीचं नाव बदलून मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) करण्यात आलं.
अनेक प्रकल्पांचं काम
कंपनीने देशातील अनेक प्रकल्पांवर काम केलं आहे. यामध्ये तेलंगणातील कलेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशनच्या बांधकामाचा समावेश आहे.मेघा कंपनीच्या सर्वात लोकप्रिय प्रकल्पांपैकी एक म्हणजे झोजिला बोगद्याचे बांधकाम, हे काश्मीरमधील गांदरबल आणि कारगिलमधील द्रास दरम्यान सर्व-हवामान कनेक्टिव्हिटी प्रदान करते. या प्रकल्पाची किंमत सुमारे 25,000 कोटी रुपये आहे.
साम्राज्य अनेक देशांमध्ये पसरलं
मेघा इंजिनियरिंग एंटरप्रायझेस हळूहळू वाढू लागली आणि भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनली. या कंपनीने हळूहळू महामार्ग आणि पॉवर प्लांट यांसारख्या मोठ्या प्रकल्पांवर काम सुरू केलं. त्याचा विस्तार देशातील 20 हून अधिक राज्यांमध्ये तसंच बांगलादेश आणि कुवेतसह अनेक देशांमध्ये झाला.
डायमंड हाऊसमध्ये राहतात
पीपी रेड्डी यांची वैयक्तिक संपत्ती 2.3 अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे ₹ 19,230 कोटी आहे. त्यांच्या कंपनीचं मूल्य 67,500 रुपये कोटी आहे. तो आता हैदराबादमध्ये एका हिऱ्यासारख्या दिसणाऱ्या घरात राहतात. त्याचं घर आता शहरातील ऐतिहासिक स्थळांमध्ये गणलं जातं. त्याच्या फार्महाऊसमध्ये गोल्फ कोर्सही आहे.
966 कोटी रुपयांच्या निवडणूक देणग्या
MEIL ने 966 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले होते आणि 'लॉटरी किंग' सँटियागो मार्टिन यांच्या मालकीच्या फ्युचर गेमिंगनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खरेदीदार म्हणून उदयास आली आहे. सीबीआयने कंपनी आणि काही सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. छत्तीसगडमधील जगदलपूर इंटिग्रेटेड स्टील प्लांटशी संबंधित एमईआयएलची 174 कोटी रुपयांची बिलं मंजूर करण्याच्या बदल्यात 78 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आठ अधिकाऱ्यांवर आरोप आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.