लेह: गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यासांठी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लडाखमध्ये आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच वांगचुक यांचे 21 दिवसांचे उपोषण संपले, त्यानंतर आता त्यांनी उद्या (दि.7) चीनच्या अतिक्रणाविरोधात बॉर्डर मार्चचे आवाहन केले आहे. या मार्चच्या पार्श्वभूमीवर सरकारने परिसरात कलम 144 लागू केले असून, इंटरनेट बंदी आदेशही लागू केला आहे.
सोनम वांगचुक यांनी 27 मार्च रोजी महात्मा गांधींच्या दांडी यात्रेच्या धर्तीवर 'पश्मिना मार्च'ची हाक दिली होती. तसेच, लडाखच्या हजारो लोकांना 7 एप्रिल रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेकडे निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू करण्यात आले असून, सुरक्षा दलही तैनात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वांगचुक म्हणतात की, एकीकडे लडाखच्या सुमारे 1.5 लाख चौरस किमी जमिनी कॉर्पोरेट्सला जात आहेत, तर दुसरीकडे चीनही त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करत आहे. गेल्या पाच वर्षांत चीनने भारतीय भूमीचा मोठा भाग काबीज केला आहे. याविरोधात त्यांनी या मोर्चाचे आवाहन केले आहे.
दरम्यान, वांगचुक यांनी एक्सवर एक व्हिडिओही पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी लेहचे युद्धक्षेत्रात रुपांतर केल्याचा दावा केला. ते म्हणाले की, आमच्या मोर्चाला रोखण्यासाठी विविध ठिकाणी बॅरिकेडींग, अश्रुधूरासह मोठ्या प्रमाणात सुरक्षादल तैनात करण्यात आले आहेत. शांतताप्रिय युवा नेत्यांनाही अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे दिसते की, प्रशासनाला सर्वात शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक बनवायचे आहे. सरकारला फक्त आपल्या मतांची चिंता आहे, आमची नाही.
"आमचा लढा सुरुच राहणार...", सोनम वांगचुक यांनी 21 दिवसांनंतर मागे घेतले उपोषण
प्रशासनाने शुक्रवारी दोन स्वतंत्र आदेश जारी केले. लडाखच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी जारी केलेल्या आदेशात पोलिस आणि गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देऊन म्हटले की, असामाजिक घटक मोबाइल डेटा आणि सार्वजनिक वायफायचा वापर करुन जनतेला भडकावण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळेच मोबाईल डेटा सेवा 2G वर आणण्यात आली आहे. हा आदेश शनिवारी संध्याकाळी 6 ते रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लेह शहर आणि आसपासच्या 10 किमी परिसरात लागू असेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.