समाजात चोरी, दरोडे यांचे प्रकार वाढतच आहेत, त्यात आता वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून नागरिकांची फसवणूक करून त्यांना लुटलं जाण्याच्या घटनाही वाढत आहेत. लग्नामध्ये कन्यादानाचं पॅकेज देऊन त्याद्वारे नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार हरियाणामध्ये उघडकीस आला.
त्या संदर्भात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक करून मिळवल्याचं त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबात म्हटलं आहे. लग्नात कन्यादान देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेणाऱ्या दोन आरोपींना हरियाणा पोलिसांनी नूह इथं अटक केली आहे. बूबलहेरी इथं राहणारा मौलाना अर्शद आणि पलवल जिल्ह्यात राहणारे राशीद अशी त्यांची नावं असून त्यांनी या प्रकारे एकूण 1400 लोकांना फसवलं आहे. तसंच त्यातून 14 कोटी रुपयांची रक्कम मिळवली आहे.
लग्नांमध्ये कन्यादानाचं पॅकेज देतो सांगून ते दोघं लोकांची फसवणूक करत होते. वेगवेगळ्या सरकारी योजनांच्या नावाखाली ते लोकांकडून एक ते दीड लाख रुपये घ्यायचे. त्या पॅकेजमध्ये कन्यादानाच्या रुपात स्प्लेंडर ही मोटारसायकल, लग्नाचं सगळं साहित्य आणि 21 हजार रुपये रोख देण्याचं कबूल केलं जात होतं. प्रत्यक्षात लोकांची फसवणूक करून त्यांना लुबाडलं जात होतं. नगिना तालुक्यातील नांगल शाहपूरमध्ये राहणाऱ्या झुबेदा हिनं 1 एप्रिल 2024 रोजी त्या संदर्भात तक्रार दाखल केली होती. मौलाना अर्शद आणि राशीद यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांनी दोन महिन्यांपूर्वी फसवणूक करून तिच्याकडून एक लाख 10 हजार रुपयांची रक्कम लुबाडली होती, असं तिनं म्हटलंय.कन्यादान म्हणून एक स्प्लेंडर मोटारसायकल, लग्नाचं साहित्य आणि 21 हजार रुपये रोख देण्याचं कबूल करून आरोपींनी महिलेकडून रक्कम घेतली होती. त्या संदर्भात आरोपींवर नगिना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक रतन सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या एका पथकानं मंगळवारी (2 एप्रिल) आरोपींना पकडलं. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी नगिना येथील बडकली चौक इथं राशीदला व बुबलहेरी गावातून अर्शदला ताब्यात घेतलं.
जवळपास 1400 लोकांकडून मुलींच्या लग्नात कन्यादानासाठी रक्कम हडपल्याचं आरोपींनी प्राथमिक चौकशीत कबूल केलं. या पद्धतीनं त्यांनी 14 कोटी रुपये लोकांकडून घेतले. आरोपींना न्यायालयात सादर केल्यावर चार दिवसांच्या पोलीस कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करून गुन्ह्याचा तपास करत आहेत. कन्यादानासाठी पॅकेज देतो सांगून आरोपींनी खूप मोठी रक्कम लोकांकडून घेतली. अनेक दिवसांपासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. पोलीस चौकशीत आणखी माहिती समोर येऊ शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.