मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकींना काही दिवस शिल्लक आहेत. अनेक कलाकार मंडळी राजकरणार प्रवेश करत आहेत. तर काहींनी राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक होण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत मनोरंजन विश्वातील कलाकारांची मागणी वाढू लागली आहे. कलाकारांना लाखो रुपये देऊन प्रचार करण्यासाठी बोलावलं जातं. यंदा कोणते कलाकार कोणत्या पक्षाचा आणि नेत्याचा प्रचार करणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. पण या कलाकारांना निवडणुकांचा स्टार प्रचारक म्हणून काम करण्याचे किती पैसे मिळतात माहितीये? त्यांच्या भाषेत याला सुपारी असं म्हटलं जातं. कितीची असते एका कलाकाराची सुपारी? पाहूयात.
मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार राजकीय प्रचारासाठी 20-25 लाखांच्या सुपारीपासून सुरुवात करतात. तर काहींना 10 लाखांची सुपारी देखील दिली जाते. मराठी कलाकारांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुलनेनं त्यांच्या सुपाऱ्यांचा आकडा कमी आहे. मराठी कलाकारांच्या सुपारीचा आकडा 7 लाख रुपयांपासून सुरू होतो. तर काहीजण 3 लाखांवरही समाधान मानतात.
सिनेमातील कलाकार आणि टेलिव्हिजनवरील कलाकार असा एक गट तयार केला जातो. ज्यात टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या काही आघाडीच्या कलाकारांना 2-3 लाख रुपये दिले जातात. तर काही सहाय्यक कलाकारांना 50-60 हजारांची सुपारी दिली जाते. मराठी इंडस्ट्रीत सध्या अभिनेत्री सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, अमृता खानविलकर, भरत जाधव, नेहा पेंडसे, श्रृती मराठे, सिद्धार्थ जाधव, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, वैभव मांगले त्याचप्रमाणे, अंकुश चौधरी, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ चांदेकर, प्रसाद ओक, संतोष पवार या कलाकारांची क्रेझ पाहायला मिळतेय. कलाकारांची सोशल मीडियावर देखील चांगलीच चलती असल्यानं त्याचाही वापर राजकीय प्रचारासाठी करता येतो.पाहायला गेल्यास अनेक मराठी कलाकारांनी राजकीय पक्ष प्रवेश केला आहे. ज्यात अभिनेता सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, हार्दिक जोशी, आदिती सारंगधर, माधव देवचके, राजेश भोसले, योगेश शिरसाट, अलका परब, शेखर फडके, केतन क्षीरसागर, अमोल नाईक, प्रतीक पाटील त्याचप्रमाणे महेश मांजरेकर, संजय नार्वेकर, आदेश बांदेकर, विजय पाटकर आदी कलाकारांचा समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.