शिरूर: लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने महाराष्ट्रात आतापर्यंत 23 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोषणा करण्यात आल्या नव्हत्या.
यामागे भाजपसोबतच्या जागावाटपाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे उमेदवारांची नावे जाहीर होण्यास विलंब होत आहे. पण भाजपने अगदी योग्य वेळी आपले उमेदवार हे जाहीरही करून टाकले. अशावेळी शिंदे आणि अजित पवार हे काहीसे मागे राहिले आहेत. पण आता अजित पवार यांनी देखील आपल्या उमेदवारांची घोषणा करून टाकली आहे.
अजित पवार यांनी जागावाटपाची चर्चा कुठपर्यंत पोहोचली आहे, याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, 'आमच्या महायुतीमध्ये कोणताही गोंधळ नाही. आम्ही एकत्र बसलो आणि सीट शेअरिंगचा निर्णय घेतला. भाजप आणि शिवसेनेने आम्हाला सहकार्य केले आहे. जागांचा निर्णय जवळपास पूर्ण झाला आहे. ९० टक्के निकाल आमच्यात झाला आहे. आम्ही 28 मार्चला जागावाटपाची घोषणा करू. त्यावेळी एक संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यात शिवसेना आणि भाजपचे नेतेही सहभागी होणार आहेत.'
अजित पवारांनी 'या' नेत्यांना दिलं लोकसभेचं तिकीट
रायगड: दरम्यान, भाजप पाठोपाठ अजित पवार यांनी आपले आज दोन उमेदवार हे जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा त्याच मतदारसंघातून अजित पवारांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केली.
शिरूर: दुसरीकडे शिरूर मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ज्यानंतर अजित पवार यांनी शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली.
बारामती: दुसरीकडे बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं तिकीट पक्कं असल्याचं सध्या बोललं जात आहे. त्यामुळे या तिसऱ्या जागेचा प्रश्नही निकालात निघाला आहे. मात्र, या तीन जागांव्यतिरिक्त भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजप शिंदे-पवारांना नेमक्या किती जागा देणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीतील अजित पवार गटाला 4 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 9 किंवा 10 जागा मिळू शकतात. तर भाजप एकूण 30 जागा लढविण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.