घसा दुखत असल्याने रुग्णालयात गेला; Endoscopy करताच डॉक्टरांचा उडाला थरकाप
कधी-कधी अशी काही मेडिकलशी संबंधित प्रकरणं समोर येतात, ज्यामुळे सामान्य लोकांनाच नव्हे तर डॉक्टरांनाही धक्का बसतो. व्हिएतनाममध्ये अशीच एक घटना घडली आहे. जी समोर येताच सर्वांनाच धक्का बसला आहे. यात एका व्हिएतनामी व्यक्तीला घशाचा त्रास होऊ लागला आणि बोलताना त्याचा आवाजही कर्कश येऊ लागला. तपासणीनंतर शेवटी त्याला समजलं, की 6 सेमी लांब जळू त्याच्या घशात शिरली आहे आणि रक्त शोषत आहे.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा कधी सर्दी होते तेव्हा घसाही दुखू लागतो आणि आवाजही कर्कश होतो. पण त्या सगळ्याचे परिणाम खूप भयानक झाले तर? वास्तविक, या 53 वर्षीय व्हिएतनामी व्यक्तीला घसा दुखण्याची आणि खवखवण्याची समस्या देखील होती. मात्र त्याने याला सामान्य समजलं. परंतु जेव्हा त्याने रक्त थुंकण्यास सुरुवात केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याचं त्याच्या लक्षात आलं. अशा स्थितीत तो घाबरला आणि थेट डॉक्टरांकडे गेला, तिथे धक्कादायक खुलासा झाला. त्याच्या घशामध्ये एक जळू असल्याचं समोर आलं.
जेव्हा तो माणूस हनोईच्या नॅशनल हॉस्पिटल ऑफ एंडोक्रिनोलॉजीमध्ये घशात दुखत असल्याची आणि अधूनमधून रक्तस्त्राव होत असल्याची तक्रार घेऊन आला तेव्हा डॉक्टरांनी एन्डोस्कोपी केली. ज्यामध्ये त्याच्या शरीरात 6 सेमी लांबीची जळू असल्याचं दिसून आलं. यात समजलं की 6 सेमी लांब जळू त्याच्या घशात अडकला आहे . तो श्वासनलिकेजवळील ग्लोटीसच्या खाली होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या घशातील जळू काढला.या प्रकरणात, त्या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितलं की, सुमारे एक महिन्यापूर्वी उंदीर पकडण्याचा सापळा हाताळताना त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्याने काहीही विचार न करता घराबाहेरून काही औषधी वनस्पती आणल्या आणि त्या चघळायला सुरुवात केली. त्यानंतर त्या औषधी वनस्पती चावून त्याची पेस्ट बनवून हातावरील जखमेवर लावली. यामुळे त्याचा हात बरा झाला, पण घशातील त्रास वाढला. डॉक्टरांनी सांगितलं की त्या पानांमध्ये जळू लपल्या असाव्यात, ज्यामुळे जळूने तोंडात प्रवेश केला आणि समस्या निर्माण झाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.